महत्वाच्या बातम्या

 वैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती उपसा : ६.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त


- देवरी घाट परिसरात पोलिसांची कारवाई; ट्रॅक्टर, ट्रॉलीसह एक ब्रास रेती जप्त परमेश्वर नागपुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : वैनगंगा नदीपात्रातून विनापरवाना रेती उत्खनन करून तिची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. देवरी घाट परिसरातून अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती असा एकूण ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ३ नोव्हेंबर रोजी सकाळी करण्यात आली.

परमेश्वर चक्रधर नागपुरे २३ वर्ष, रा. सुंदरटोला, देवरी, जि. गोंदिया असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास देवरी घाट परिसरातील वैनगंगा नदीपात्रातून सायटोला येथे विनापरवाना रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात कारवाई केली असता परमेश्वर नागपुरे हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती भरून वाहतूक करताना आढळून आला.

पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची तपासणी करून मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ट्रॅक्टरची किंमत ५ लाख रुपये, ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीची किंमत १ लाख रुपये, तर ट्रॉलीतील एक ब्रास रेतीची किंमत ६ हजार रुपये, असा एकूण ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दवनीवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ई) अन्वये आरोपी परमेश्वर नागपुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धर्मपाल भुरे करीत आहेत.वैनगंगा नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाईची गरज व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos