सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन व धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भगवान धन्वंतरी हे आरोग्यशास्त्राचे दैवत मानले जाते. आरोग्य संवर्धन आणि आयुर्वेदाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने धन्वंतरी जयंती राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त सामान्य रुग्णालय, भंडारा येथील आयुष विभागाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यंदाच्या निरोगी उद्यासाठी आयुर्वेद (Ayurveda for a Healthier Tomorrow) या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत विविध रुग्णालयांमध्ये आयुष शिबिरे, योगसत्रे, महालॅबच्या माध्यमातून मोफत रक्त तपासणी, तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, रक्तदान मोहीम तसेच आयुष जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आयुर्वेद व आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धाही घेण्यात आल्या.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली तसेच आरोग्य संवर्धनासाठी आयुर्वेदाच्या उपयोगाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अतुल टेंभुर्णे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. भास्कर खेडिकर, सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.




Petrol Price




