गंभीर आजारांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी लोकसंवाद कार्यक्रमातून सहायता निधीची जनजागृती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाच्या डॉ. किमया गंधे यांनी केले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने बाल गणेश मंडळ, नेरी (पुनर्वसन) आणि बाल गणेश मित्र मंडळ, देवळी येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा आणि उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात आली.
यावेळी डॉ.किमया गंधे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत गंभीर आजारांच्या उपचारासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपचारासाठी आर्थिक मदत मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती, कोणत्या स्वरूपाच्या आजारांसाठी मदत उपलब्ध होऊ शकते, तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या आवश्यक बाबींची त्यांनी माहिती दिली.
उपचाराचा वाढता खर्च लक्षात घेता आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा आधार ठरू शकतो. त्यामुळे पात्र रुग्णांनी योजनेची माहिती घेऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असेही यावेळी सांगण्यात आले. उपस्थित नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संबंधित विविध प्रश्न विचारले. डॉ. गंधे यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
नेरी (पुनर्वसन) येथील बाल गणेश मंडळाच्या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष अविनाश कोहरे यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तसेच देवळी येथील बाल गणेश मित्र मंडळाच्या कार्यक्रमास अध्यक्ष निखील सडमाके, सदस्य स्वप्निल बुटे, अधिवक्ता बरखा बुटे, ऋषभ आखाडे, शुभम दहाघाने, अंकित बुटे यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, पंढरीनाथ लुटे उपस्थित होते.




Petrol Price




