महत्वाच्या बातम्या

 धर्मांतर रोखण्यासाठी ग्रामसभांचा पुढाकार : भामरागड पट्टी इलाका ग्रामसभेत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी भामरागड दौऱ्यावर असताना भामरागड पट्टी इलाका ग्रामसभेच्या बैठकीला उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीमध्ये आदिवासी समाजात वाढत असलेल्या धर्मांतराच्या विषयावर गंभीर चर्चा करण्यात आली. आदिवासी समाजाने धर्मांतर करू नये तसेच धर्मांतर केलेल्या व्यक्तींनी पुन्हा समाजात परत यावे, अन्यथा अशा व्यक्तींना आदिवासी समाजाच्या सोयी-सुविधा देण्यात येऊ नयेत, असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

तसेच आदिवासी समाजामध्ये दारूबंदी झाली पाहिजे, असा महत्त्वपूर्ण मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. समाजातील तरुण पिढी व्यसनमुक्त राहून समाजाच्या विकासासाठी पुढे आली पाहिजे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी डीजे संस्कृतीला विरोध करत पारंपरिक नृत्य, गाणी व वाद्य यांचाच वापर विवाह सोहळे व इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये करण्यात यावा, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की, ग्रामसभा स्वयंपूर्ण झाल्यास समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. आदिवासी समाजाची बोलीभाषा, रूढी-परंपरा आणि संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर धर्मांतर रोखणे अत्यंत आवश्यक आहे. समाज दिशाहीन होऊ नये यासाठी ग्रामसभांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी मजबूत केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

तसेच भारत सरकारने देशात धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी दिल्ली येथे २२, २३, २४ आणि २५ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही माजी आमदार डॉ. होळी यांनी केले.

भामरागड तालुक्यात धर्मांतराच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत ग्रामसभेमार्फत सामाजिक जनजागृती सुरू केल्याबद्दल माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी ग्रामसभेचे अभिनंदन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos