ब्रम्हपुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला २४ तासांत जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत चोरीच्या गुन्ह्यातील आंतरराज्यीय सराईत चोरट्यांच्या टोळीला अवघ्या २४ तासांच्या आत अटक करून चोरीस गेलेली रक्कम आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ जॉनी ता. ब्रम्हपुरी येथील रहिवासी रामचंद्र सखाराम मोहुर्ले यांनी २२ जून रोजी सकाळी सि.डी.सी.सी. बँक, ब्रम्हपुरी येथून ३० हजार रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी कापडी पिशवीत ठेवून तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात मुलीच्या जात प्रमाणपत्राच्या कामासाठी गेले होते.
सेतू केंद्रात असताना त्यांच्या मागून कोणीतरी आवाज दिल्याने त्यांनी मागे वळून पाहिले. मात्र, त्याचवेळी त्यांच्या जवळ ठेवलेली पैशांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. पिशवीत रोख रक्कम तसेच बँकेचे पासबुक होते. शोध घेऊनही पिशवी न सापडल्याने त्यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. विविध तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील संशयितांचा माग काढत चार आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रिहान सिकंदर सिसोदिया (वय २१), रितिक निरज सिसोदिया (वय २५), प्रकाश गनराजसिंग सिसोदिया (वय २६) आणि असवंत भारतसिंग सिसोदिया (वय २८) यांचा समावेश असून सर्व आरोपी कडिया सासी, ता. पचोर, जि. राजगड (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहेत.
आरोपींची झडती घेतली असता चोरीस गेलेली संपूर्ण रोख रक्कम, फिर्यादीचे बँक पासबुक तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यामुळे हा गुन्हा यशस्वीरीत्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे तसेच पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार, वशिष्ठ रंगारी यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




