शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी ९ जुलै रोजी गडचिरोलीत भव्य मोर्चा : राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचा सहभाग


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती, गडचिरोली यांच्या नेतृत्वाखाली ९ जुलै २०२६ रोजी गडचिरोली येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यरत शिक्षकांना टीईटी अनिवार्यता लागू करणे, पदोन्नतीतील अन्यायकारक अटी, संच मान्यता धोरण तसेच बीएलओ आणि एस.आय.आर. कामाची सक्ती याविरोधात राज्यभर पुकारण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनाच्या अनुषंगाने ५ जुलै २०२६ रोजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, गडचिरोली येथे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन सभा पार पडली. सभेत आंदोलनाची रूपरेषा, मोर्चाचे नियोजन आणि विविध संघटनांची जबाबदारी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेत सर्वानुमते गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही सभेत देण्यात आला.
नियोजन सभेला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कास्टाईब शिक्षक संघटना, शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, कास्टाईब कल्याण महासंघ, आदर्श शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तसेच इतर समविचारी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व संघटनांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस रघुनाथ भांडेकर, योगेश ढोरे, चक्रपाणी कन्नाके, पुंडलिक देशमुख, बापू मुनघाटे, प्रविण सहारे, प्रदीप सेलोकर, अशोक रायसिडाम, खिरेंद्र बांबोळे, ओमप्रकाश साखरे, दिवाकर नारनवरे, राजेश चिल्लमवार, अशिम बिश्वास, रमेश रामटेके, आशिष धात्रक, देवेंद्र लांजेवार, गंगाधर मडावी, साईनाथ अलोने, जयंत राऊत, संजय मडावी, समीर भजे, अमरदीप भुरले, सचिन मेश्राम, सुरेश चौधरी, जितेंद्र रायपुरे, संजय येलेवार यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी ९ जुलै रोजीच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिक्षकांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढा उभारावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक व प्रशासकीय स्तरावर या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जाईल, अशी अपेक्षा शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




