गाढवाच्या एक लीटर दूधाला १० हजार रुपयांचा भाव : भोंगा लावून विक्री


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / उस्मानाबाद  :
दररोजच्या अन्नातील महत्वाच्या घटकापैकी एक म्हणजे दूध. आपण आपल्या आहारात दुधाचा समावेश करतो. साधारणपणे आपण 70 ते फार 80 रुपये प्रति लीटर या दराने दूध खरेदी करतो. पण तुम्हाला कोणी सांगितले की एका लीटर दुधाचा भाव हा चक्क 10 हजार रुपये आहे. एकतर हा दर ऐकून तुम्हाला धक्का बसेल, किंवा तुम्ही समोरच्याला काय गाढवणपणा करतोय, असे म्हणाल. पण हा शुद्ध 'गाढव'पणाच आहे. उस्मानाबादमध्ये गाढविणीच्या एका लीटर दुधाला 10 हजार रुपये प्रति लीटर इतका भाव मिळतोय.  

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात गाढविणीचे दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जातेय. विशेष म्हणजे हे दूध भोंगा लावून विकले जातेय. उमरगा शहरातील गावठाण. या ठिकाणी पाल ठोकून नांदेड जिल्ह्यातील भोकरचे धोत्रे कुटुंबीय राहतात. त्यांच्याकडे २० गाढविणी आहेत. या गाढविणीच धोत्रे कुटुंबाचं उपजीविकेचे साधन आहे. 
गाढविणीचे दूध लहान मुलांसाठी तसंच दमा आणि न्यूमोनियासाठी गुणकारी असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या दुधाला विशेष मागणी असते. गाढविणीचं दूध उमरगा शहरात सध्या भोंगा लावून विकले जातेय. विशेष म्हणजे घरासमोरच दूध काढून विक्री केली जातेय. 10 मिली लीटर दुधासाठी 100 रुपये मोजावे लागतात. सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यामुळेही दुधाची मागणी वाढली आहे.
मागील २ ते ३ वर्षांपासून नांदेड भागातून ही लोक उमरगा भागात दूध विक्रीसाठी येतायेत. गाढविणीचं दूध उपयुक्त असल्याचे उमरगावासियांचे म्हणणे आहे.
गाढविणीच्या दुधात व्हिटॅमिन डी मात्रा अधिक आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्येही गाढविणीच्या दुधाचा वापर केला जातो. गाय, म्हैस आणि शेळीच्या दुधा इतकंच हे दूध सकस असल्याचे सांगितले जात आहे. 
दुधाला पूर्णान्न म्हटले जाते. निरोगी आयुष्यासाठी दूध प्यायलाच हवे. लहान मुलांसाठी तर आईचे स्तनपान अमृतासमानच आहे. त्यात आता गाढविणीच्याही दुधाची भर पडलीय.  Print


News - World | Posted : 2021-08-09
Related Photos