तंत्रज्ञ-3 भरती वादात महाजेनको अडचणीत : उच्च न्यायालयाची स्थगिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महानिर्मिती कंपनीच्या (महाजेनको) तंत्रज्ञ-३ पदभरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेवर अखेर न्यायालयाने हस्तक्षेप केला असून, नागपूर खंडपीठाने नियुक्ती आदेशाच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील उमेदवारांचे लक्ष आता आगामी सुनावणीकडे लागले आहे.
राजुरा येथील सौरभ मादसवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. दीपक चटप यांनी भरती प्रक्रियेत काही उमेदवारांना विशेष लाभ देण्यात आल्याचा मुद्दा ठळकपणे मांडला.
याचिकेनुसार, महाजेनकोच्या एका परिपत्रकाद्वारे केवळ कोराडी विद्युत केंद्र परिसरातील उमेदवारांना २५ अतिरिक्त गुण देण्यात आले. राज्यात अनेक विद्युत केंद्रे अस्तित्वात असताना फक्त एका केंद्रातील उमेदवारांना हा लाभ देण्यात आल्याने इतर भागातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त उमेदवारांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात जागा देण्यात आल्याचाही मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला. शासन नियमानुसार मर्यादित आरक्षण असताना प्रत्यक्ष निकालात ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागा प्रकल्पग्रस्त उमेदवारांना देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर कंत्राटी उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्याच्या पद्धतीवरही आक्षेप घेण्यात आला.
या सर्व बाबींची प्राथमिक दखल घेत न्यायालयाने नियुक्ती आदेशाच्या अंमलबजावणीस पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी ११ जून २०२६ रोजी होणार असून, भरती प्रक्रियेतील नियम, आरक्षण पद्धती आणि गुणविभाजनाची वैधता यावर सविस्तर सुनावणी होणार आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य उमेदवारांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक व समान संधीच्या तत्त्वावर आधारित असावी, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




