गडचिरोली : रांगी-जांभळी मार्गावरील पुल अर्धवट, नागरिक संतप्त; तात्काळ बांधकाम न झाल्यास विराट आंदोलन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुकला प्रतिनिधी / धानोरा : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील रांगी ते जांभळी मार्गावरील नाळेवारीवरील पुलीचे बांधकाम दीड दशकांपासून अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नाल्यातून मार्गक्रमण करावे लागते. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासन आणि शासनाकडे अनेकदा मागणी केली तरी ठोस कार्यवाही होत नसल्याने आता राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पुढाकाराखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील जांभळी, दवंडी आणि रांगी गावातील नागरिक अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रांगी येथील आठवडी बाजार, बँक व्यवहार तसेच जिल्हा कार्यालयीन कामासाठी नागरिकांना धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत असल्याचे जांभळी गावकऱ्यांनी मानवाधिकार संघटनेस दिलेल्या निवेदनात सांगितले.
प्रशासनाकडे मागण्यांचा परिणाम नाही -
गडचिरोली जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला अनेक वर्षांपासून पुल बांधकामासाठी निवेदनं दिली जात आहेत, मात्र आजपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही वारंवार मागणी केली गेली तरीही फक्त आश्वासनं मिळाली आहेत. यामुळे ग्रामस्थांचा संताप वाढला असून त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांचा इशारा -
प्रणय खुणे यांनी सांगितले, सदर पुलाचे बांधकाम तात्काळ सुरू करावे. अन्यथा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने विराट जनआंदोलन आणि बेमुदत उपोषण छेडण्यात येईल.
स्थानिक उपस्थिती -
यावेळी जांभळीचे सरपंच अनंती पदा, सदस्य आसाराम ताडाम, देवराव उसेंडी, रागीनी उसेंडी, अनुसया ताडाम, बारीकराव उसेंडी, देवनाथ कुमोटी, निरंगशहा हलामी, नेताजी हुरा, काशिनाथ गोटा, राजू टेकाम, श्रीराम ताडाम, बाबुराव उसेंडी, मनिराम हारामी, रेवन उसेंडी, सुरेश परसा, मनीराम पदा यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पुलाचे बांधकाम तात्काळ सुरू झाले नाही तर प्रशासनविरोधी आंदोलन आणखी तीव्र होईल, कारण या मार्गावरील सुरक्षिततेची स्थिती प्रत्येक वर्षी गंभीर बनत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




