महत्वाच्या बातम्या

 सत्यशोधक समाजाच्या शताब्दी सुवर्ण महोत्सवा निमित्त नमाद महाविद्यालयात विविध कार्यक्रम


- महात्मा फुले यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात उतरावेत - डॉ. शारदा महाजन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : सर्व साक्षी जगत्पती, त्याला नकोशी मध्यस्थी हे ब्रीद घेऊन महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्ष  पूर्ण झाल्याच्या म्हणजे शताब्दी सुवर्ण महोत्सवा निमित्त येथील गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. चर्चासत्र, निंबध स्पर्धा व व्याख्यान आयोजित करून सत्य शोधक समाज व संस्थापक महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. आपले संपूर्ण जीवन समाज सुधारणेसाठी वाहून घेणारे महात्मा फुले यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात उतरले पाहिजे, असे आवाहन प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी केले. गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन व संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात सत्यशोधक समाजाच्या शताब्दी सुवर्ण महोत्सवा निमित्त प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात महात्मा फुले व सत्यशोधक समाज या विषयावर चर्चासत्र घेण्यात आला. महात्मा फुले यांना अपेक्षित सामाजिक समता निर्माण झाली काय. या विषयावर निंबध स्पर्धा घेण्यात आली. चर्चासत्र व निंबध स्पर्धेत बहुसंख्य महाविद्यालयीन विध्यार्थी सहभागी झालेत. महात्मा फुले यांचे क्रातीकारी विचार आणि समाजमत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. धोटे बंधु विज्ञान महाविद्यलयातील प्रा. धर्मवीर चौहाण मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अर्चना जैन, डॉ. बबन मेश्राम, प्रा. योगेश भोयर, डॉ. एच पी पारधी, डॉ. किशोर वासनिक, डॉ. शशिकांत चौरे, डॉ. एफ एम शहा, प्रा. घनशाम गेडेकर, डॉ. उमेश उदापूरे, डॉ. सुनिल जाधव उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. शारदा महाजन म्हणाल्या, महात्मा फुले हे थोर महान समाज सुधारक होते. महात्मा फुले यांचे विचार आणि सुधारणा वर्तमानाशी सुसंगत आहेत. महापुरुषांचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. आपण साऱ्यांनी पुढाकार घेऊन महात्मा फुले यांचे विचार अंगीकारून समाजाच्या सुधारणेत काही योगदान करू या, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले. मार्गदर्शन करताना प्रा. चौहाण यांनी महात्मा फुले यांचा जीवन परिचय आणि त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत समाज सुधारणेसाठी केलेला संघर्ष विदयार्थ्यांना समजावून सांगितला. अज्ञान, विषमता आणि दारिद्रय संपविण्यासाठी महात्मा फुले यांनी संघर्ष केला. महात्मा फुले यांनी पुण्याच्या बुधवारपेठेत १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. त्यानंतर अनेक शाळा सुरु करून ज्ञानदानाचे महान कार्य केले. त्यांच्या शाळेत शिकलेल्या मुक्ता साळवे नावाच्या १० वर्षाखालील बालिकेने लिहिलेला निंबध ज्ञानोदय मासिकाने प्रकाशित केला. एवढा शैक्षणिक दर्जा त्यांच्या शाळेत होता. स्त्रियांना केवळ शिक्षण देणे एवढेच पुरेसे नाही तर सामाजिक सुधारणा सुद्धा महत्वाची आहे जाणून महात्मा फुले यांनी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्यात. महात्मा फुले यांनी केशवपन प्रथेविरुद्ध विरुद्ध लढा दिला, न्हाव्याचा संप घडवून आणला. विधवा पुनर्विवाह घडवून आणला. बालसंगोपन गृह सुरु केले. काशीबाई नावाच्या विधवेच्या मुलाला दत्तक घेतले. त्याला शिकवून डॉक्टर बनविले. सत्य शोधक समाज पद्धतीने त्याचा आंतरजातीय विवाह करविला. महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य आजही तेवढेच लागू आहेत. त्यांचे विचार समाजात रुजविण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रा. चौहाण यांनी आपल्या भाषणात सांगितले. सत्यशोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या म्हणजे शताब्दी सुवर्ण महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विध्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात अंकेश रामटेके, पायल बनोटे, दीपिका लिल्हारे, प्रणवी चौरे, रुपेश बावणे, भाग्यश्री खोब्रागडे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किशोर वासनिक यांनी केले. संचालन अंकेश रामटेके तर आभार डॉ. एच पी पारधी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विध्यार्थ्यानी परिश्रम घेतले.





  Print






News - Gondia




Related Photos