नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा : मंत्री सुधीर मुनगंटीवार
- श्री माता कन्यका सेवा संस्थेच्या वतीने जागतिक श्रवणदिनानिमित्त श्रवणयंत्र वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात, त्यांच्या आरोग्याची योग्य निगा राखण्यात, वेळच्या वेळी उपचार देण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात आदर्श ठरावा. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य शिबिरे घ्या. कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचारापासून वंचित राहायला नको. देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मध्ये उल्लेख व्हावा, असे काम आपल्या हातून झाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री माता कन्यका सेवा संस्थेच्या वतीने जागतिक श्रवणदिनानिमित्य श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे, संस्थेचे सचिव राजेश्वर सुरावार, शैलेंद्रसिंह बैस, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. इशिता मांडविया, डॉ. श्वेता लोहिया, श्वेता आईचवार, विवेक माणिक, डॉ. राहुल भोंगळे, डॉ. सचिन बिलवणे यांचा सत्कार करण्यात आला. तर सागर खडसे, सुरज पेदूलवार, प्रज्वलंत कडू यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
यावेळी डॉक्टर व रुग्णांनी आपले अनुभव सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सकांनी मला निधीची गरज असल्याचे सांगितले. डीपीडीसीतून निधी उपलब्ध करून दिला आणि आज हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे आज खूप आनंद होत आहे, अशी भावना ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, जगातील सर्वांत सुरक्षित जागा आईची मांडी आहे. जगातील सर्वांत मोठे सिंहासन देखील आईची मांडी आहे. जगातील सर्वांत मोठा सागर आईच्या हृदयातील प्रेमाचा सागर आहे. अशावेळी तिला जेव्हा कळते की बाळाला ऐकू येत नाही तेव्हा तिच्या मनाची अवस्था तिलाच ठावूक असते. त्यामुळे या कार्यक्रमात आपण मुलांना मदत करीत नसून मातेचा गौरव करतोय.
रुग्णांना वेळीच उपचार मिळावा -
चंद्रपूरमधील प्रत्येक गोष्ट उत्तम करण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणूनच मेडिकल कॉलेज, शंभर खाटांचे हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल आपण चंद्रपूरमध्ये करतोय. प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करतोय. कारण एखाद्याला गंभीर आजाराने ग्रासले तर त्याला वेळीच उपचार मिळायला हवा, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. अखेरच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा करण्यासाठी परमेश्वराने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना करतानाच गरिबांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प आपण करीत असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.
News - Chandrapur