कुकडेल येथील शाळेची इमारत धोकादायक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / कोरची : कोरची मुख्यालयापासून अंदाजे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकडेल येथील एक इमारत पूर्णपणे जीर्ण अवस्थेत झाली असून या इमारतीला धोकादायक इमारत सुद्धा घोषित करण्यात आले असून सद्यस्थितीत शाळेत एकच इमारत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे खूप अवघड होत असल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून सदर इमारत निर्लेखित करण्यात यावी याकरिता कित्येकदा संबंधित विभागाला पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आले परंतु अजूनही सदर इमारत निर्लेखित करण्यात आलेली नसून या इमारती पासून कधीपण धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकडेल येथील शाळेतील पटसंख्या ४७ असून येथे वर्ग एक ते वर्ग पाच पर्यंतचे विद्यार्थी धडे घेत आहेत. मागील चार महिन्यापासून वर्गखोलीची कमतरता असल्यामुळे जवळच असलेल्या ग्रामसभेच्या कार्यालयात वर्ग ४ व वर्ग ५ चे विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे दिसून येत आहे. चिंतेची बाब म्हणजे तीन वर्षांपूर्वी या शाळेची पटसंख्या ६८ होती नंतर ५७ झाली व मागील वर्षी ही ५२ वर आली तर यावर्षी पटसंख्या ४७ पर्यंत येऊन पोहोचली आहे. जीर्ण इमारत हे यामागचे मोठे कारण असल्याचे पालकांकडून बोलले जात आहे.
या शाळेच्या आवारात पिण्याच्या पाण्याची विहीर तर आहे परंतु सदर विहिर ही जानेवारी महिन्यामध्ये आटून जात असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी दिली. जीर्ण झालेल्या सदर इमारतीमुळे कधी पण मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या इमारतीच्या सभोवती पटांगण असल्यामुळे येथे लहान लहान विद्यार्थी खेळत असतात. आपले जीव मुठीत घालून विद्यार्थी व शिक्षक या शाळेत येत असल्याचे दिसून येत आहे. सदर विषय हे गंभीर असून याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने धोकादायक इमारतींचे निर्लेखन करून पाडण्यात यावे व नवीन इमारतीचे बांधकाम करून देण्यात यावे अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे.
News - Gadchiroli