भंडाऱ्यात ऑपरेशन फ्लश ची धडक मोहीम : ३१.११ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३२ जणांवर गुन्हे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पुणे येथील अलीकडील घटनेनंतर भंडारा जिल्हा पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले असून जिल्हाभर अवैध दारूविरोधात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. ऑपरेशन फ्लश अंतर्गत गेल्या २४ तासांत विविध ठिकाणी करण्यात आलेल्या धडक कारवाईत तब्बल ३१ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध दारू निर्मिती, साठवणूक आणि विक्रीप्रकरणी ३२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात वाढत्या अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत ५० पोलिस अधिकारी आणि ३०० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी तपासणी, छापेमारी आणि कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पालांदूर पोलिसांच्या दोन कारवाया -
पालांदूर पोलिसांनी अवैध देशी दारू साठवणूक व विक्रीविरोधात दोन स्वतंत्र कारवाया केल्या. पहिल्या कारवाईत कन्हाळगाव येथील नलिन खोब्रागडे यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी ९० मिली क्षमतेच्या देशी दारूचे २४ पव्वे जप्त करण्यात आले. दुसऱ्या कारवाईत मुरमाडी (तूपकर) येथील नितेष मेश्राम (वय ३८) याच्याकडून टायगर ब्रँड देशी दारूचे सात पाऊच जप्त करण्यात आले. या दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आंधळगावमध्ये हातभट्टीवर छापा -
आंधळगाव पोलिसांनीही अवैध हातभट्टी दारूनिर्मितीविरोधात मोठी कारवाई करत १ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दिनेश रामदास मरकाम (वय ३५, रा. कमकासुर, ता. तुमसर) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक नितीन राठोड यांना आंबागड शेतशिवार परिसरात हातभट्टीद्वारे मोहफुलाची दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपी घटनास्थळी आढळून आला. पोलिसांनी तेथून दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सुमारे ७५० किलो सडवा मोहफुल, अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे साहित्य तसेच इतर साहित्य जप्त केले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र वैद्य, मंगेश गभने, पवन समरीत, दीपक हटवार, राजेंद्र पारधी आणि पौर्णिमा इळपाते यांनी यशस्वीपणे पार पाडली.
अवैध दारूविरोधातील मोहिमेला गती -
ऑपरेशन फ्लश अंतर्गत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमार्फत सातत्याने धडक कारवाया सुरू असून आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग कटिबद्ध असल्याचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले. त्यांनी नागरिकांनाही अवैध दारू व्यवसायाची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
News - Bhandara




Petrol Price




