महत्वाच्या बातम्या

 राज्यातील ५०० खासगी कॉलेजांना फीवाढ नको


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईतील डी.जे. संघवी, डॉन बॉस्को, झेवियर्स यांसारख्या खासगी इंजिनीअरिंग कॉलेजांसह मेडिकल, बीडीएस, एमबीए, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सुमारे ५०० खासगी कॉलेजांमध्ये यंदा फीवाढ होणार नाही.

व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या खासगी संस्थाचालकांना दरवर्षी राज्याच्या शुल्क नियंत्रण प्राधिकरणाकडून (एफआरए) ते संबंधित अभ्यासक्रमावर करत असलेल्या खर्चाच्या आधारे शुल्कवाढीकरिता प्रस्ताव सादर करून फीवाढ मिळवता येते. परंतु, यंदा ४८० अभ्यासक्रमांकरिता संस्थांनी शुल्कवाढीला नकार दिला आहे.

एमबीबीएस, एमडी अभ्यासक्रम राबविणाऱ्या पुण्याच्या काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये (एमबीबीएस - फी १४.२३ लाख, एमडी-एमएस - १२.९४ लाख), सोलापूरचे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजमध्ये (एमबीबीएस ९.८६ लाख, एमडी-एमएस - ११.८१ लाख) गेल्या वर्षीचेच शुल्क आकारले जाईल. शुल्कवाढ नको म्हणणाऱ्यांमध्ये फार्मसीची महाविद्यालये अधिक आहेत. गेल्या वर्षी बीफार्मच्या साधारणपणे १४ हजार ३०० जागा रिक्त राहिल्या होत्या. जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक असल्याने फार्मसीची महाविद्यालये शुल्कवाढ टाळत असावीत. कारण यंदा जवळपास ७८ महाविद्यालयांनी बीफार्म या पदवी अभ्यासक्रमाच्या फीवाढीला नकार दिला आहे. तर २८ महाविद्यालयांनी एम फार्मची फीवाढ टाळली आहे. त्या खालोखाल इंजिनीअरिंगमधील २७ पदव्युत्तर आणि ६१ पदवी अभ्यासक्रमांकरिता शुल्कवाढ नको असल्याचे संस्थाचालकांनी कळविले आहे. तर एमबीएच्या ४५ महाविद्यालयांनी शुल्कवाढीला नकार दिला आहे.

तीन वर्षे दिलासा -

शुल्कवाढीला संस्थांनीच नकार दिल्याने संबंधित अभ्यासक्रमांकरिता गेल्या वर्षीचेच शुल्क आकारले जाईल. त्यामुळे या संस्थांमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या पालकांना पुढील तीन वर्षे शुल्कवाढी पासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील या काही संस्थांमध्ये शुल्कवाढ नाही -

- एमबीएस - सेंट झेवियर्स, दुर्गादेवी सराफ, अलाना

- इंजिनीअरिंग - डी. जे. संघवी, डॉन बॉस्को, झेवियर्स

- फार्मसी - नानावटी, ओरिएंटल

फीवाढ नाकारणारे अन्य अभ्यासक्रम व संस्था -

एलएल.बी. (तीन वर्षांचा) १८, एलएल.बी. (पाच वर्षांचा) २२, एम.सीए. ७, आर्किटेक्चर ११, बीएस्सी नर्सिंग २४, फिजिओथेरपी आणि आयुर्वेद ९, बीडीएस ४

आणखी २२६ संस्थांनीही नाकारली शुल्कवाढ -

या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त आणखी २२६ खासगी संस्थांनीही शुल्कवाढ नाकारली आहे.

कृषी शिक्षणसंस्थांनीही नाकारली शुल्कवाढ -

बीएस्सी ॲग्रिकल्चर अभ्यासक्रम चालविणाऱ्या २१ संस्थांना शुल्कवाढ नको आहे. ॲग्रिकल्चर बिझनेस अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांनीही शुल्कवाढीला नकार दिला आहे.






  Print






News - Rajy




Related Photos