सावली तालुक्यातील सोनापूर येथे भीषण गॅस स्फोट : घर जळून खाक, दोघे जखमी


- माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची तत्परता; रुग्णालयात धाव घेत जखमींच्या प्रकृतीची घेतली माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील सोनापूर येथे आज रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत बंडू सोमणकर यांचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेत घरातील दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बंडू सोमणकर यांच्या घरातून अचानक गॅस गळती झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर अचानक झालेल्या जोरदार स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, संपूर्ण गाव हादरून गेले. स्फोटानंतर काही क्षणांतच घराने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले.
या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, फर्निचर तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्या असून, सोमणकर कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. प्राथमिक माहितीनुसार गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण संबंधित यंत्रणांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेत जखमी झालेल्या दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनालाही घटनेची माहिती दिली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच डॉ. अशोकजी नेते यांची तत्परता -
या दुर्घटनेची माहिती सोनापूर येथील स्थानिक सोशल मीडिया प्रमुख प्रदीप भांडेकर यांनी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिवाकर गेडाम यांनी तत्काळ माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी कोणताही विलंब न करता जखमींच्या उपचाराबाबत माहिती घेण्यासाठी तत्परता दाखवली.
त्यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात संपर्क साधून उपशल्यचिकित्सक छायाताई ऊईके यांच्याकडून जखमींच्या उपचारासंदर्भात माहिती घेतली.दरम्यान, जखमी रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल न होता व्याहाड बुज येथील डॉ. अमित बाटवे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याची माहिती मिळाल्यानंतर डॉ. नेते यांनी तेथील उपचार व्यवस्थेबाबतही माहिती घेतली. जखमींच्या प्रकृतीची सातत्याने चौकशी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी संबंधितांशी संपर्क साधला. संकटाच्या काळात राजकीय भूमिका बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने धावून जाणारी ही तत्परता परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, डॉ. अशोकजी नेते यांच्या संवेदनशील भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
गॅस वापरताना नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन माजी खासदार डॉ. नेते यांनी केले -
घरगुती गॅसचा वापर करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. गॅसचा वास येत असल्यास तातडीने गॅसचा रेग्युलेटर बंद करावा, विद्युत स्विच सुरू किंवा बंद करू नयेत, घरातील दरवाजे-खिडक्या उघडून हवा खेळती ठेवावी आणि संबंधित यंत्रणेशी तातडीने संपर्क साधावा.
गॅसच्या वापराबाबत नागरिकांनी सदैव सतर्क राहावे. सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने गॅस सिलेंडर, रेग्युलेटर व पाइपची वेळोवेळी तपासणी करून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी केले.




Petrol Price




