रेल्वे रुळावर आत्महत्येसाठी निघालेल्या १९ वर्षीय तरुणीचे रामनगर पोलिसांनी वाचविले प्राण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : रामनगर पोलिसांच्या सतर्कता, प्रसंगावधान आणि तातडीच्या कार्यवाहीमुळे रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या १९ वर्षीय तरुणीचे प्राण वाचविण्यात यश आले. पोलिसांच्या या वेळेवरच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास गोंदिया–चांदा फोर्ट रेल्वे मार्गावर एक तरुणी आत्महत्येच्या उद्देशाने जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच चार्ली-५ पथकातील पोलीस अमलदार ज्ञानेश्वर तळवेकर आणि पोलीस अमलदार शशीकांत जिवतोडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित तरुणीचा शोध घेऊन तिला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.
प्राथमिक चौकशीत संबंधित तरुणीने वैयक्तिक कारणांमुळे मानसिक नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तिचे समुपदेशन करून तिला धीर दिला. तसेच तिच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावून संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली. आवश्यक समज व मार्गदर्शन केल्यानंतर तरुणीला तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप सोपविण्यात आले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना मानसिक तणाव, नैराश्य किंवा कौटुंबिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या व्यक्तींना भावनिक आधार देण्याचे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.
आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित ११२ या आपत्कालीन क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनी वेळेवर दिलेल्या माहितीमुळे अनेकांचे अमूल्य प्राण वाचू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
News - Chandrapur




Petrol Price




