पाेहण्याचा माेह, मित्राला वाचवायला गेलेलाही नदीत बुडाला : वाकी येथील घटना
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : खापा येथील वाकी (ता. सावनेर) परिसरात फिरायला व पार्टीसाठी गेलेल्या १२ मित्रांपैकी दाेघे कन्हान नदीच्या पात्रात पाेहायला उतरले. पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या मित्राला वाचविण्यासाठी गेलेलाही मित्र बुडाला. ही घटना ३० ओक्टोम्बर ला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. सायंकाळपर्यंत त्यांचे शाेधकार्य करण्यात आले. मात्र, त्यांचा थांगपत्ता लागला नाही, अशी माहिती पाेलीस उपनिरीक्षक ओमकलेगुरवार यांनी दिली.
कुणाल गणेश लोहेकर (२४) व नितेश राजकुमार साहू (२७) दाेघेही रा. स्नेहदीप कॉलनी, जरीपटका, नागपूर अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. कुणाल व नितेश त्यांच्या इतर १० मित्रांसाेबत वाकी शिवारातील कन्हान नदीच्या परिसरात फिरायला व पार्टीसाठी गेले हाेते. अन्य १० मित्र आपापल्या कामात व्यस्त असताना कुणाल व नितेश यांना दाेघांनाही नदीत पाणी पाहताच पाेहण्याचा माेह अनावर झाला आणि दाेघेही पाण्यात उतरले.
पाेहताना कुणाल खाेल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. नितेशने त्याला वाचविण्यासाठी त्याचा हात धरला. त्यांना पाण्यातून बाहेर निघणे शक्य न झाल्याने दाेघेही बुडाले. ते बुडत असल्याचे पाहून त्यांच्या इतर मित्रांनी तिथून पळ काढला हाेता, अशी माहिती काही प्रत्यक्ष दिली. माहिती मिळताच खापा पाेलिसांनी घटनास्थळ गाठून शाेधकार्य सुरू केले. मात्र, अंधार हाेईपर्यंत दाेघांचाही थांगपत्ता लागला नव्हता.
बचाव पथकाची दिरंगाई
या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश साेळंके, रा. उत्तर नागपूर यांनी नागपूर शहरातील एनडीआरएफ व आपत्कालीन विभागाला दिली. त्यांचे बचाव पथक घटनास्थळी दाखल हाेईपर्यंत बराच वेळ झाला हाेता. त्यामुळे मुलांचे काय झाले, याबाबत कुटुंबीयांना माहिती मिळत नव्हती. त्यांना नागपूर शहरातून वाकी येथे येण्यास बराच वेळ लागत असल्याने खापा (ता. सावनेर) किंवा सावनेर शहरात बचाव पथक द्यावे तसेच घटनास्थळी कायमस्वरूपी उपाययाेजना कराव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सूचना फलकाकडे दुर्लक्ष
या डाेहाच्या काठावर प्रशासनाने सूचना फलक लावले असून, त्यातील एका फलकावर डाेहात बुडून मृत झालेल्यांची नावे तर दुसऱ्या फलकावर कुणीही डाेहात उतरू नये असे अवाहन नमूद आहे. मात्र, हाैशी तरुण मंडळी या सूचनांकडे कधीच लक्ष देत नाहीत. शिवाय, चाेरट्यांनी ते फलक चाेरून नेल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली.
News - Nagpur