मुंबई साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार : पोलीस आयुक्त नगराळे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
 येथील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल शुक्रवारी समोर आली होती. दुर्दैवाने पीडितेची मृत्यूशी झुज थांबली आहे. या घटनेसंदर्भात आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली. घटनेनंतर काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नराधाम चौहानला १० दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. एक महिन्याच्या आतमध्ये हा संपूर्ण गुन्हा उघडकीस आणून याचा तपास पूर्ण करण्यात येईल. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचेही आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले आहे.
खैरानी रोडवर महिला जखमी असल्याचे कळल्यावर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्वतः जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असून २१ सप्टेंबरपर्यंत १० दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे. या घटनेसंदर्भात सुरक्षा रक्षकांकडून पहिल्यांदा माहिती मिळाली. एका महिन्याच्या आत संपूर्ण गुन्हा उघडकीस आणून याचा तपास पूर्ण करण्यात येईल. या गुन्ह्यात जास्त आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, आतापर्यंतच्या तपासात एकच गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेचा जबाब नोंदवता आला नाही. त्यामुळे या घटनेत नेमके काय झाले? याबद्दल अद्याप काहीच माहिती मिळाली नसल्याचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-09-11Related Photos