महत्वाच्या बातम्या

 मोहफुलाची दारू अन् देशी-विदेशी मद्य जप्त : आरमोरी पोलिसांची तीन ठिकाणी कारवाई


- ९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी आरमोरी पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक छापे टाकून हातभट्टीची मोहफुलाची दारू तसेच देशी-विदेशी मद्याचा अवैध साठा जप्त केला. या कारवाईत एकूण ९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही मोहीम राबविण्यात आली.

 पहिली कारवाई आरमोरी शहरातील चांभार मोहल्ला परिसरात करण्यात आली. येथील यमु टिकाराम खेडकर ६० वर्ष यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता, विक्रीसाठी ठेवलेली १० लिटर हातभट्टीची मोहफुलाची दारू (किंमत २ हजार रुपये) आढळून आली. दुसऱ्या कारवाईत वैरागड येथील गाढे मोहल्ल्यातील अक्षय निळकंठ जराते (३१) याच्या घरातून १ हजार ६०० रुपये किमतीची ८ लिटर हातभट्टीची मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली.


तिसऱ्या कारवाईत वढधा येथील छगन रमेश लाकडे (३२) याच्या दुकानाची तपासणी केली असता, हायवर्ड्स बिअरचे १३ टिन, रॉयल स्टॅगच्या ५ निपा व रॉकेट संत्रा देशी दारूच्या २० निपा असा ६ हजार १०० रुपयांचा अवैध मद्यसाठा पोलिसांच्या हाती लागला. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईत पोलीस अंमलदारांसह मुक्तिपथ संघटनेच्या प्रतिनिधींनीही सहभाग घेतला. या प्रकरणांचा पुढील तपास अनुक्रमे महिला पोलीस हवालदार अर्चना हलामी, महिला पोलीस हवालदार चंपा कामतकर आणि पोलीस हवालदार रत्नाकर कुमरे करीत आहेत.





  Print






Related Photos