राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत गडचिरोली जिल्हा संघाला द्वितीय क्रमांक


- अमरावती, ठाणे, मुंबई, अहिल्यानगर व पुणे संघांना नमवित अंतिम फेरीत प्रवेश; राधिका मगरे प्लेअर ऑफ द टूर्नामेंट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : चंद्रपूर महानगर बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल, बाबूपेठ, चंद्रपूर येथे १० ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या सब-ज्युनियर बॉल बॅडमिंटन राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकाविला.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील मुला-मुलींच्या एकूण ५४ संघांनी या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट सांघिक खेळ, आक्रमकता आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आपली विजयी वाटचाल कायम ठेवली.
बलाढ्य संघांवर मात करत अंतिम फेरीत धडक -
गडचिरोलीच्या मुलींच्या संघाने साखळी फेरीत अमरावती, ठाणे आणि मुंबई या संघांचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपउपांत्य फेरीत अहिल्यानगर संघावर मात करत संघाने उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीतील सामना गडचिरोली संघासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. या सामन्यात बलाढ्य पुणे संघाचा पराभव करत गडचिरोलीच्या मुलींनी आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडली. या विजयासह गडचिरोली जिल्हा संघाने प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला.
अंतिम सामन्यात यवतमाळकडून पराभव -
अंतिम सामन्यात गडचिरोली संघासमोर यवतमाळ संघाचे आव्हान होते. अंतिम सामन्यात गडचिरोलीच्या खेळाडूंनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र यवतमाळ संघाने बाजी मारल्याने गडचिरोली जिल्हा संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारून रौप्यपदक पटकावणे ही गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून, या कामगिरीमुळे जिल्ह्यातील बॉल बॅडमिंटन खेळाडूंमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राधिका मगरे प्लेअर ऑफ द टूर्नामेंट -
स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याची राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन खेळाडू राधिका मगरे हिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने विशेष ठसा उमटविला. तिच्या उल्लेखनीय खेळाची दखल घेत तिला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट या किताबाने गौरविण्यात आले. यावेळी राधिका मगरे हिचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांचा सहभाग -
गडचिरोली जिल्हा संघात संघनायक सुप्रिया जुवारे, राधिका मगरे, मोहिनी पिंपरखेडे, श्रेया होळी, निधी जांभुळकर, आणिया आंबटकर, अनाया धाकडे, शर्वरी यमपलवार, कृतिका तिवारी आणि माधवी कळते या खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
संघाला प्रा. रूपाली पापडकर यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले, तर लावण्या प्रेमलवार यांनी व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली. खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, संघातील खेळाडूंचा सांघिक समन्वय आणि कठोर सराव महत्त्वाचा ठरला.
मान्यवरांकडून अभिनंदन -
गडचिरोली जिल्हा संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार व माजी मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम, आमदार मिलिंद नरोटे, तनुश्री आत्राम, नगरसेवक लीलाधर भरडकर, क्रीडाशिक्षक मनीष बनवले, बॉल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, सचिव प्रा. ऋषिकांत पापडकर, सुभाष धंदरे, आशिष निजाम, सुमित आलाम, विनय कोवे, विपुल उंदीरवाडे, यश बुरांडे आणि उमंग चौधरी यांनी खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांचे विशेष अभिनंदन केले.
गडचिरोलीच्या मुलींनी राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारत मिळविलेला द्वितीय क्रमांक आणि राधिका मगरे हिला मिळालेला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा किताब यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. या यशामुळे गडचिरोली जिल्ह्यातील युवा खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची प्रेरणा मिळाली आहे.




Petrol Price




