महत्वाच्या बातम्या

 भामरागड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात


- विकसित भारत उपक्रमांतर्गत ६० विद्यार्थ्यांची नोंदणी; सामाजिक कार्यात सक्रिय सहभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : येथील राजे विश्वेश्वर राव कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष डाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे डॉ. प्रमोद घोनमोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कैलास निखाडे, डॉ. सुरेश डोहाने आणि वैशाली मिच्छा उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना डॉ. संतोष डाखरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे महत्त्व विशद केले. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्यात सामाजिक बांधिलकी, स्वयंसेवक वृत्ती आणि राष्ट्रसेवेची भावना निर्माण करणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होताना विद्यार्थ्यांना समाजातील विविध समस्या समजून घेण्याची आणि त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष योगदान देण्याची संधी मिळते. श्रमदान, स्वच्छता, जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते, असे डॉ. डाखरे यांनी स्पष्ट केले. यावेळी भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.

विकसित भारत उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद -
कार्यक्रमादरम्यान ‘विकसित भारत’ उपक्रमांतर्गत ६० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. देशाच्या विकास प्रक्रियेत युवकांची भूमिका महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून विविध विकासात्मक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

प्रमुख पाहुणे डॉ. कैलास निखाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रमदानाचे महत्त्व स्पष्ट केले. समाजाच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असून विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. सुरेश डोहाने यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्यांवर प्रकाश टाकला. स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांची जाणीव ठेवून समाजहितासाठी जबाबदारीने कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

सामाजिक परिवर्तनात योगदान देण्याचे आवाहन -
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी विद्यार्थ्यांनी समाजसेवेसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांच्या समस्या जाणून घेऊन सकारात्मक बदलासाठी योगदान द्यावे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनू मडावी यांनी केले, तर इरपा पुंगाटि यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना समाजसेवा, श्रमदान आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा संदेश मिळाला.





  Print






Related Photos