महत्वाच्या बातम्या

 ज्ञानेश कुमार राजीनामा द्या! शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत कम्युनिस्ट पार्टीची मागणी


- निवडणूक आयोगाच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी राष्ट्रपतींकडे निवेदन; एटापल्लीत राजीनाम्याचे बॅनर झळकले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : ज्ञानेश कुमार राजीनामा द्या! अशा ठाम मागणीचे बॅनर हातात धरून भारतीय कम्युनिस्ट पार्टी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात उपस्थित झालेल्या गंभीर प्रश्नांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, या मागणीसाठी भारताच्या राष्ट्रपतींकडे उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. या वेळी शेकडो नागरिक उपस्थित होते.

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार आणि जिल्हा सदस्य कॉम्रेड सुरज जककुलवार यांच्या उपस्थितीत ही मागणी करण्यात आली. राजीनाम्याची मागणी करणारे बॅनर झळकवत पक्षाने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आपली भूमिका ठामपणे मांडली.

The Indian Express च्या अहवालातील मुद्द्यांची चौकशी करा! -
निवेदनात The Indian Express च्या तपासणी अहवालाचा संदर्भ देत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कामकाजाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या अहवालानुसार, आयोगातील अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी मागील दहा महिन्यांच्या कालावधीत काही निर्णयांबाबत किमान १४ वेळा औपचारिक आक्षेप नोंदवल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे, फॉर्म-६ मधील बदल, डिजिटल मतदार माहितीचे व्यवस्थापन आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेसंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांची अधिकृत नोंदींच्या आधारे तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पात्र मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करा! -
मतदार यादीतून पात्र नागरिकांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्यास त्यांच्या मतदानाच्या अधिकारावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली आहे का, SIR प्रक्रियेत पात्र नागरिकांवर अन्याय झाला आहे का आणि संबंधित नियमांचे पालन करण्यात आले आहे का, याची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार सुरक्षितपणे बजावता आला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेबाबत शंका निर्माण करणाऱ्या बाबींची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे ही काळाची गरज असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांची आक्रमक भूमिका -
भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार म्हणाले, लोकशाही ही जनतेच्या संघर्षातून उभी राहिलेली व्यवस्था आहे. जनतेच्या मतदानाच्या अधिकाराबाबत प्रश्न निर्माण होत असतील, तर त्यांची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. ज्ञानेश कुमार राजीनामा द्या! ही आमची मागणी असून मुख्य निवडणूक आयुक्तांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. निवडणूक आयोगाच्या कामकाजातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित झाले पाहिजे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कामगार आणि सामान्य जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा संघर्ष यापुढेही सुरूच राहील!

राजीनामा, निष्पक्ष चौकशी आणि कायदेशीर कारवाईची मागणी -
निवेदनाद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, संबंधित निर्णयप्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करावी, SIR प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे चुकीने वगळली गेली आहेत का याची पडताळणी करावी आणि अनियमितता अथवा कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच, आवश्यक असल्यास संविधानातील अनुच्छेद ३२४(५) आणि संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार सक्षम प्राधिकरणाने योग्य प्रक्रिया विचारात घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रपतींनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती घटनात्मक कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांच्या सहभागातून निवडणूक आयोगाच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी ठामपणे मांडण्यात आली.





  Print






Related Photos