११ वर्षीय विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू


- मध्यरात्री अचानक प्रकृती बिघडली; केशोरी येथून ग्रामीण रुग्णालयात हलविले, उपचारादरम्यान प्राण गमावले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील बुटाई कॅम्प क्रमांक एक (नवनीतपूर) येथील ११ वर्षीय विद्यार्थिनीचा सर्पदंशामुळे बुधवारी २३ रात्रीच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. प्राजक्ता रंजीत उईके (वय ११) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे बुटाई कॅम्प क्रमांक एक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्राजक्ता उईके ही बुटाई कॅम्प क्रमांक एक येथील रहिवासी असून, गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत होती. प्राजक्ता अवघी दोन वर्षांची असतानाच तिच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर तिचे वडील आणि काका तिचे पालनपोषण करीत होते.
आरतीला गेली, घरी आली अन् झोपी गेली -
गावात गणेशोत्सव सुरू असल्याने प्राजक्ता बुधवारी सायंकाळी गणपती बाप्पाच्या आरतीसाठी गेली होती. आरती आटोपल्यानंतर ती घरी परतली. घरी आल्यानंतर तिने जेवण केले आणि त्यानंतर झोपी गेली.
झोपण्यापूर्वीपर्यंत प्राजक्ताला कोणताही त्रास जाणवत नव्हता. मात्र, मध्यरात्रीनंतर अचानक तिला वेदना होऊ लागल्या. तिची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले.
केशोरीतून ग्रामीण रुग्णालयात हलविले -
प्राजक्ताला सर्वप्रथम केशोरी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वेळ न दवडता तिला पुढील उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच प्राजक्ताचा मृत्यू झाला. सर्पदंशामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
लहान वयातच हरपले होते मातृछत्र -
प्राजक्ता अवघी दोन वर्षांची असतानाच तिच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर वडील आणि काका तिचे संगोपन करीत होते. इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्राजक्ताचा अचानक मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गणेशोत्सवाच्या उत्साहात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे बुटाई कॅम्प क्रमांक एक (नवनीतपूर) गावात शोककळा पसरली आहे. प्राजक्ताच्या आकस्मिक निधनाने तिचे शिक्षक, सहाध्यायी आणि ग्रामस्थांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.




Petrol Price




