महत्वाच्या बातम्या

 आज सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज जनजागृती सत्राचे आयोजन


- नवसंशोधक, युवक आणि स्टार्टअप्सना सहभागी होण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना व विविध समस्यांवरील प्रभावी उपाययोजना मांडण्यासाठी सेवा संकल्प अभियान अंतर्गत सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त इच्छुकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीद्वारे २२ ऑक्टोबर  रोजी विशेष जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हे सत्र नागपूर येथील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालय, वैनगंगा इन्क्युबेशन फाऊंडेशन येथे दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे. या जनजागृती सभेमध्ये सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या उपक्रमाची मुख्य उद्दिष्टे, सहभागाविषयी उपलब्ध असलेल्या विविध संधी, नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्याची अचूक प्रक्रिया तसेच उपक्रमाशी संबंधित सर्व बाबींची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. कार्यक्रम दरम्यान महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वत उपस्थित राहून संबंधित भागधारकांशी थेट संवाद साधतील आणि उपक्रमाबाबत मार्गदर्शन करतील.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, नवउद्योजक, स्टार्टअप प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या सर्व इच्छुकांनी या जनजागृती सत्रात मोठ्या संख्येने सहभागी होऊन माहितीचा लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यातील संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाचा प्रसार पात्र व इच्छुक घटकांपर्यंत करून त्यांना सहभागासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






Related Photos