सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अनिरुद्ध पालकर सदैव तत्पर!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्याधिकारी; घोट येथे नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्याधिकारी अनिरुद्ध पालकर अल्पावधीतच जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. उच्चपदस्थ जबाबदारी सांभाळत असतानाही सर्वसामान्य नागरिकांशी थेट संपर्क ठेवणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शासनाच्या माध्यमातून त्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांची कार्यशैली विशेष लक्षवेधी ठरत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विविध घडामोडींवर लक्ष ठेवून नागरिकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पालकर प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. सामान्य शेतकरी, गरीब, शोषित, वंचित, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लोकप्रतिनिधी अशा सर्व घटकांतील नागरिकांशी ते समानतेने संवाद साधतात. प्रत्येकाच्या अडचणी ऐकून घेणे, त्यांचा मानसन्मान राखणे आणि संबंधित समस्येवर काय उपाययोजना करता येईल, यासाठी पुढाकार घेणे, ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
नागरिकांसाठी थेट संपर्काची भूमिका -
सामान्यतः वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या पदांवरील व्यक्तींपर्यंत आपली समस्या पोहोचविणे सर्वसामान्य नागरिकांसाठी कठीण ठरते. अनेकदा वरिष्ठ अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यासही टाळाटाळ करतात. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असतानाही अनिरुद्ध पालकर नागरिकांना आपला भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देतात. ओळखीचा असो वा अनोळखी, नागरिकांचा फोन स्वीकारून त्यांच्याशी संवाद साधण्याची त्यांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.
जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबरोबरच नागरिकांच्या हाकेला प्रतिसाद देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू असल्यास आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, त्यांच्या मागण्या समजून घेणे आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, यावरही ते भर देत असल्याचे दिसून येते. शासनाची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांच्या अपेक्षा शासनापर्यंत नेणे, अशा दुहेरी भूमिकेतून ते काम करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आष्टीतील आंदोलनानंतर घोटमध्ये नागरिकांशी संवाद -
अनिरुद्ध पालकर यांच्या या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा प्रत्यय २ नोव्हेंबर २०२६ रोजी घोट येथे आला. आष्टी येथील आंदोलनाला भेट देऊन परत येत असताना त्यांनी घोट येथील चौकात नानू उपाध्ये यांच्या हॉटेलमध्ये अचानक चहासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. यावेळी कोणताही औपचारिकपणा न ठेवता त्यांनी उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.
या भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य, गरीब, शोषित आणि वंचित घटकांच्या हितासाठी कशा प्रकारे प्रयत्नशील आहे, याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. यासोबतच स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा, समस्या आणि विकासासंदर्भातील मुद्देही जाणून घेतले.
उच्चपदस्थ पदावर कार्यरत असतानाही सामान्य नागरिकांमध्ये सहजपणे मिसळून त्यांच्या अडचणी ऐकून घेण्याच्या या भूमिकेचे उपस्थितांनी स्वागत केले. पदाचा बडेजाव न करता थेट जनतेशी संवाद साधण्याची कार्यपद्धती ही लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे किशोर कुंडू, जितेंद्र शहा, विलास सावकार वडेट्टीवार, आशित विश्वास, रामटेके, दिनेश मुजुमदार, घोट येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत उपाध्ये, आसिफ सय्यद यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची तत्परता आणि शासनापर्यंत त्यांचा आवाज पोहोचविण्याचा प्रयत्न यामुळे अनिरुद्ध पालकर यांची गडचिरोली जिल्ह्यात विशेष चर्चा होत आहे. शासन आणि जनता यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी अशा लोकाभिमुख प्रयत्नांची आवश्यकता असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




Petrol Price




