गोवंश व दारू तस्करीतील दोन सराईत गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडपिपरी परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी गोंडपिपरी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली आहे. गोवंश तस्करी आणि अवैध दारू तस्करीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या दोघांना चंद्रपूर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
यामध्ये अशफाक मस्तान कुरेशी ४३ वर्षे रा. गोंडपिपरी हा सराईत गोवंश तस्कर असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (अ) व (ब) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव गोंडपिपरी पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची दखल घेत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी अशफाक कुरेशी याला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित केला. त्यानुसार पोलिसांनी आदेशाची बजावणी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
दुसऱ्या कारवाईत सुंदरसिंग उर्फ सुलविंदरसिंग तेजासिंग डांगी २३ वर्षे रा. जोगापूर, ता. गोंडपिपरी या सराईत दारू तस्कराविरुद्धही हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (अ) व (ब) अन्वये सादर केलेल्या प्रस्तावावर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्यालाही सहा महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. गोंडपिपरी पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी केली आहे.
या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला असून, परिसरातील अवैध धंदे आणि समाजविघातक कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. यापुढेही कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या तसेच गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध यापेक्षाही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंडपिपरीचे ठाणेदार हेमंत पवार यांनी केले.




Petrol Price




