नागभीडात चौघांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ एकच


- जनकापूर-चिंधी माल घटनांमधील अंतर केवळ ७ ते ८ किमी; नागरिकांमध्ये दहशत, हिंस्र वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / नागभीड : नागभीड वनपरिक्षेत्रात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पाच महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात चौघांचा बळी गेल्याने वनविभागाच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, जनकापूर आणि चिंधी माल येथे झालेल्या दोन हल्ल्यांमधील अंतर अवघे ७ ते ८ किलोमीटर असल्याने या दोन्ही शेतकऱ्यांचा बळी घेणारा वाघ एकच असावा, अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे.
एवढेच नव्हे, तर एप्रिलपासून नागभीड वनपरिक्षेत्रात झालेल्या चारही मानवी हल्ल्यांमागे एकाच हिंस्र वाघाचा हात असावा, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. मात्र, नागभीड तालुक्यात वाघांची संख्या मोठी असल्याने चारही हल्ले एकाच वाघाने केले की वेगवेगळ्या वाघांनी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे वनविभागाने तातडीने वैज्ञानिक पद्धतीने शोधमोहीम राबवून संबंधित वाघाची ओळख निश्चित करावी आणि नागरिकांमधील भीती व संभ्रम दूर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दोन हल्ल्यांमध्ये अवघे ७ ते ८ किलोमीटर अंतर -
४ ऑगस्ट रोजी जनकापूर शिवारात रमेश काशिवार यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वनविभागाने संबंधित वाघाला आकर्षित करण्यासाठी बेड वर एक जनावर ठेवले होते. हे जनावरही वाघाने फस्त केले.त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी चिंधी माल परिसरात मोरेश्वर सावसाकडे यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतला. जनकापूर आणि चिंधी माल या दोन्ही घटनास्थळांमधील अंतर अवघे ७ ते ८ किलोमीटर आहे.
तसेच जनकापूर येथे वनविभागाने ठेवलेल्या जनावरापासून चिंधी माल परिसर अवघ्या ३ ते ४ किलोमीटर अंतरावर आहे.वाघ मोठ्या अंतरापर्यंत भ्रमण करू शकत असल्याने दोन्ही हल्ल्यांमागे एकाच वाघाचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वनकर्मचाऱ्यांकडूनही वाघाच्या भ्रमणक्षमतेचा विचार करता हा एकच वाघ असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले जात आहे.
पाच महिन्यांत चौघांचा बळी -
नागभीड वनपरिक्षेत्रात गेल्या पाच महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ५ एप्रिल रोजी मिथूर येथील हरिदास कुबडे, १९ मे रोजी किटाळी मेंढा येथील वनिता वुईके, ४ ऑगस्ट रोजी जनकापूर येथील रमेश काशिवार आणि १६ ऑगस्ट रोजी चिंधी माल येथील मोरेश्वर सावसाकडे यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला.ही चारही गावे एकमेकांपासून साधारण १० ते १२ किलोमीटरच्या परिघात असल्याने सर्व हल्ल्यांमागे एकच हिंस्र वाघ असण्याच्या चर्चेला बळ मिळत आहे.
पांढऱ्या कानाची वाघीण असल्याची चर्चा -
या चारही घटनांमागे पांढऱ्या कानाची वाघीण असल्याची चर्चा वनविभागाच्या वर्तुळात आणि स्थानिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र, या वाघिणीचीच चारही हल्ल्यांशी संबंधितता असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. एकाच परिसरात वारंवार मानवी बळी जात असल्याने संबंधित वाघाची ओळख पटविणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. वाघांच्या हालचाली, हल्ल्यांची ठिकाणे आणि त्यांच्यातील अंतर यांचा अभ्यास करून वनविभागाने या संशयाला पूर्णविराम देण्याची मागणी होत आहे.
नागभीड तालुका बनला टायगर हब -
नागभीड तालुक्यात जंगलाचा मोठा विस्तार असल्याने येथे वाघांचा वावर वाढला आहे. घोडाझरी परिसरातच चार ते पाच वाघ असल्याचे सांगितले जाते. याशिवाय मौशी, ढोरपा, म्हसली, कोसंबी गवळी, देवपायली, गायमुख, गोविंदपूर, गिरगाव, सावरगाव, वाढोणा, कचेपार, मिंडाळा, गोवारपेठ आणि नवानगर या गावांच्या जंगल परिसरातही वाघांचा मुक्त संचार असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते.वाघांची वाढती संख्या आणि जंगलालगतच्या शेतांमध्ये मानवी वावर यामुळे मानव-वाघ संघर्षाचा धोका वाढला आहे. शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना दररोज जंगलालगतच्या शेतांमध्ये जावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण -
सततच्या वाघ हल्ल्यांमुळे जंगलालगतच्या गावांतील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक शेतकरी एकट्याने शेतात जाणे टाळत असून, समूहाने शेतीची कामे करण्याची वेळ आली आहे. सायंकाळच्या वेळी जंगलालगतच्या भागात जाण्यास नागरिक धजावत नाहीत. मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या हिंस्र वाघाचा तातडीने शोध घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
एकच वाघ की वेगवेगळे वनविभागाने स्पष्ट करावे -
नागभीड तालुक्यात वाघांची संख्या मोठी असल्याने गेल्या पाच महिन्यांतील चारही हल्ले एकाच वाघाने केले की वेगवेगळ्या वाघांनी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकाच हिंस्र वाघाने वारंवार मानवी हल्ले केले असतील, तर त्याचा तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करणे आवश्यक आहे. यासाठी कॅमेरा ट्रॅप, पगमार्क, वाघाच्या हालचालींचे निरीक्षण आणि अन्य वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून संशयित वाघाची ओळख निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. हल्ल्यानंतर केवळ पंचनामा आणि पाहणी करण्यापेक्षा संभाव्य वाघाच्या हालचालींच्या परिसरात व्यापक शोधमोहीम राबविणे गरजेचे आहे.
आता आणखी किती बळी नागरिकांचा सवाल -
नागभीड वनपरिक्षेत्रात मानवी बळींची मालिका सुरू असताना नागरिकांमध्ये संतापही वाढत आहे. वाघांच्या वावराची माहिती असूनही मानवी जीविताचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.त्यामुळे वनविभागाने तातडीने या हल्ल्यांमागील वाघाची ओळख निश्चित करून त्याचा बंदोबस्त करावा, तसेच जंगलालगतच्या गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.
नागभीड तालुक्यात एकच नरभक्षक वाघ आहे की अनेक हिंस्र वाघांचा वावर आहे, याचा उलगडा आता वनविभागाच्या शोधमोहीमेतून होणे आवश्यक आहे. चार मानवी बळींनंतरही हा प्रश्न अनुत्तरित राहिल्यास नागरिकांची भीती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाच्या तातडीच्या कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




