विशाखापट्टणम येथील चिमुकल्याच्या मृत्यूनंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील मानसिक-शारीरिक दबाव थांबविण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विशाखापट्टणम येथे वर्गात शिक्षकाने सहा वर्षीय चिमुकल्याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत बल्लारपूर तालुक्यातील प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांशी प्रेमाने व संवेदनशीलतेने वागण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
लहान मुलांवर अभ्यासाचा अनावश्यक ताण देणे, अभ्यास केला नाही म्हणून मारहाण करणे, मस्ती केली म्हणून मोठ्याने ओरडणे, त्यांच्या वयाच्या तुलनेत जड दप्तर देणे तसेच शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षा करणे, अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगावे आणि त्यांचे मनोबल वाढवावे, अशी मागणी करण्यात आली. पालकांनीही मुलांकडून चुका झाल्यास त्यांना मारहाण अथवा मानसिक त्रास न देता प्रेमाने समजावून सांगावे. लहान वयात मुलांवर अनावश्यक शैक्षणिक व मानसिक ओझे टाकू नये, असे आवाहन निवेदनातून करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने हे निवेदन प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांशी संवेदनशीलपणे वागण्याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना तालुका प्रमुख बब्बू पाठक, शहर प्रमुख प्रशांत मेश्राम यांच्यासह महिला जिल्हा प्रमुख कल्पना गोरघाटे, तालुका प्रमुख सौ. मीनाक्षी गलगट, शहर प्रमुख सौ. अंजली शिवबन्सी, सौ. आशा माझी, सौ. अनिता माझी, सौ. आरती बैस, सौ. पोचुबाई, सौ. सुवर्णा मुरकुटे, पूजा टेकाम, रूपाली वासेकर आदी उपस्थित होते.




Petrol Price




