सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राचा अनोखा सन्मान : ७ ऑगस्ट भालाफेक दिन म्हणून होणार साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
टोकयो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा नुकती पार पडली. या स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू नीरज चोप्राने  इतिहास रचत सुवर्ण पदक पटकावले. ॲथलेटिक्स प्रकारात भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळाल्याने  नीरज चोप्रावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा विविध पुरस्कारांनी ठिकठिकाणी सन्मान केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या  समितीने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशात आता दरवर्षी ७ ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली आहे.
नीरज चोप्राने टोकयो ऑलिम्पिक २०२० मध्ये ७ ऑगस्टला भालाफेकीच्या अंतिम सामन्यामध्ये सुवर्णपदक पटकावले. यासोबतच विविध क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी यश मिळवले. त्यानिमित्ताने टोकयो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय ट्रॅक अँड फिल्ड ॲथलिट्सच्या सत्कार समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. देशातील जास्तीत जास्त युवा खेळाडू भालाफेक या क्रीडा प्रकाराकडे आकर्षित व्हावे, या उद्देशाने भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने ७ ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. याबाबतची माहिती भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या योजना आयोगाचे अध्यक्ष ललित भनोत यांनी या समारंभात दिली. नीरज चोप्राने या घोषणेचे स्वागत केले असून, हा सन्मान मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना त्याने व्यक्त केली.  Print


News - World | Posted : 2021-08-11
Related Photos