महत्वाच्या बातम्या

 संजय गांधी निराधार योजनेच्या २०८ अर्जांना मंजुरी : लाभार्थ्यांना मिळणार सामाजिक सुरक्षेचा आधार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : तालुका ग्रामीण संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात समितीचे अध्यक्ष आशिष कुचेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विशेष सहाय्य योजनांतर्गत प्राप्त अर्जांची सविस्तर छाननी करण्यात आली. पात्रता निकषांची तपासणी केल्यानंतर एकूण २०८ पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनांमधून लाभ मिळण्यासाठी दाखल झालेल्या अर्जांवर चर्चा करण्यात आली. संबंधित लाभार्थ्यांची कागदपत्रे, पात्रता आणि शासनाच्या निर्धारित निकषांनुसार अर्जांची तपासणी करण्यात आली.

गरीब, गरजू, निराधार, वृद्ध, विधवा तसेच दिव्यांग नागरिकांना शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत विलंब न होता पोहोचावा, यासाठी सर्व प्रशासकीय कार्यवाही पारदर्शक आणि जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश समितीचे अध्यक्ष आशिष कुचेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंजूर प्रकरणांची यादी ग्रामपंचायतीत प्रसिद्ध करणार -
मंजूर झालेल्या प्रकरणांची माहिती संबंधित लाभार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मंजूर अर्जांची यादी ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना समितीने दिल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती तसेच मंजुरीची माहिती स्थानिक पातळीवर मिळण्यास मदत होणार आहे.
सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अर्जांची छाननी आणि पुढील कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, यावर बैठकीत भर देण्यात आला.

बँक खात्याला आधार लिंक करणे अनिवार्य -
दरम्यान, योजनेचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी लाभार्थ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घेणे तसेच बँक खाते क्रमांकाशी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.लाभार्थ्यांनी ई-केवायसी आणि आधार लिंकिंगची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून योजनेचा निधी जमा करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

अधिकारी व समिती सदस्यांची उपस्थिती -
बैठकीला तहसीलदार संदीप पुंडेकर, नायब तहसीलदार तथा समितीचे सचिव संजय चिंगलवार यांच्यासह समिती सदस्य वैशाली उघडे, संदीप मारवाडी, दिलीप रघाटाटे, प्रमोद चव्हाण, प्रवीण डोंगरे आणि अतुल बावणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. २०८ पात्र अर्जांना मंजुरी मिळाल्याने सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना आर्थिक आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंजूर प्रकरणांची यादी ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांना पुढील कार्यवाहीबाबत माहिती मिळणेही सुलभ होणार आहे.





  Print






Related Photos