बंद वनउपज तपासणी गेटला दुचाकीची धडक : २८ वर्षीय युवकाचा मृत्यू


- गोंडमोहाळी फाट्याजवळ अपघात; याच गेटवर यापूर्वीही दोघांचा बळी, सुरक्षाव्यवस्थेअभावी नागरिकांमध्ये संताप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रांतर्गत गोंडमोहाळी फाट्याजवळ बंद असलेल्या वनउपज तपासणी गेटला दुचाकीची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी १२ रात्री सुमारे ७ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्रीच्या अंधारात बंद गेट स्पष्टपणे न दिसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर वाघेडा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित गेटच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातात गरुदास श्रीकृष्ण जांभूळे २८ वर्षे, रा. वाघेडा यांचा मृत्यू झाला.
कामानिमित्त पळसगावच्या दिशेने प्रवास -
मिळालेल्या माहितीनुसार, गरुदास जांभुळे हे अनंत जांभुळे आणि दिनकर मडावी यांच्यासोबत कामानिमित्त दुचाकीने पळसगावच्या दिशेने जात होते. शनिवारी रात्री गोंडमोहाळी फाट्याजवळील वनउपज तपासणी गेट परिसरात पोहोचले असता रात्रीच्या अंधारामुळे गेट बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.
काही कळण्याच्या आत दुचाकीची बंद गेटला जोरदार धडक झाली. या धडकेत गरुदास गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने मासळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
याच गेटवर यापूर्वीही दोन तरुणांचा मृत्यू -
गोंडमोहाळी फाट्याजवळील या बंद वनउपज तपासणी गेटवर यापूर्वीही अपघात होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
एकाच ठिकाणी वारंवार दुर्घटना घडूनही गेट रात्रीच्या वेळी वाहनचालकांना स्पष्टपणे दिसावे, यासाठी पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीबाबत स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
रिफ्लेक्टर, सूचना फलक व प्रकाशव्यवस्थेची मागणी -
रात्रीच्या वेळी वाहनचालकांना बंद गेटचा सहज अंदाज यावा, यासाठी गेटवर रिफ्लेक्टर, ठळक सूचना फलक आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच वाहनचालकांना दूरवरूनच गेट बंद असल्याचे लक्षात यावे, यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
याशिवाय गेट परिसरात पुरेसा बंदोबस्त ठेवावा आणि रात्रीच्या वेळी वाहनांची सुरक्षितपणे ये-जा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, अशीही मागणी होत आहे.
सुरक्षाव्यवस्थेअभावी दुर्घटनांची पुनरावृत्ती? -
यापूर्वीही याच ठिकाणी दोन तरुणांना जीव गमवावा लागला असताना पुन्हा एका तरुणाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणेने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गरुदास जांभूळे यांच्या अपघाती मृत्यूमुळे वाघेडा परिसरात शोककळा पसरली आहे. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता तरी संबंधित विभागाने या गेटच्या सुरक्षेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.




Petrol Price




