मुलमध्ये कुलूपबंद रेल्वे क्वार्टरमध्ये चोरी : सव्वा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पोळा सणाच्या सुट्टीसाठी कुटुंबासह बाहेरगावी गेलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुल येथील क्वार्टरमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. घराच्या मुख्य लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत बेडरूममधील कपाटातून १ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
सुदेश पूर्णानंद अलोणे हे रेल्वे विभागात कार्यरत असून मुल येथील रेल्वे क्वार्टरमध्ये पत्नी व मुलासह राहतात. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ते कुटुंबासह क्वार्टरला कुलूप लावून चिरोली व त्यानंतर ब्रह्मपुरी येथे गेले होते.
दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या निदर्शनास अलोणे यांच्या क्वार्टरच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळले. त्याने तत्काळ अलोणे यांना फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच अलोणे दुपारी मुल येथे परतले. घराची पाहणी केली असता बेडरूममधील लाकडी कपाट उघडे असून कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.
कपाटातील ५ ग्रॅम सोन्याच्या बाळ्या, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम सोन्याच्या बिऱ्या, ३ ग्रॅम सोन्याची नथ, १५ ग्रॅम सोन्याची चैन आणि ५० ग्रॅम चांदीचे पैजन, असा एकूण १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे समोर आले.
याप्रकरणी अलोणे यांनी मुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही चोरी केल्याचा संशय आहे. मुल पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके पुढील तपास करीत आहेत.




Petrol Price




