महत्वाच्या बातम्या

 कटेझरी येथे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर : १२२ नागरिकांची तपासणी


- पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद यांचा संयुक्त उपक्रम; गरजेनुसार मोफत औषधोपचार आणि पुढील तपासणीसाठी मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा कटेझरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात कटेझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण १२२ नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करून विविध आजार आणि पोषणविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी, त्यांना वेळेवर वैद्यकीय तपासणी व उपचार मिळावेत आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने पोलीस दलाकडून वेळोवेळी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कटेझरी येथे या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात पोलीस रुग्णालय, गडचिरोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश चिचघरे यांच्या नेतृत्वाखाली औषधनिर्माण अधिकारी प्रकाश दानव आणि अधिपरिचारिका श्रीमती शिल्पा चांदेकर यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. विविध आजारांची लक्षणे, आरोग्याची काळजी घेण्याच्या पद्धती आणि पोषणविषयक समस्यांबाबत नागरिकांना आवश्यक माहिती देण्यात आली. ज्या नागरिकांना पुढील वैद्यकीय तपासणीची गरज होती, अशा तीन नागरिकांना संबंधित रुग्णालयांत पुढील तपासणीसाठी शिफारस करण्यात आली.

आरोग्य सेवेसोबत शहीद जवानांच्या बलिदानाची माहिती -
आरोग्य शिबिराच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस जवानांचे बलिदान, सी-६० पथकातील जवानांचे शौर्य आणि गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणारे नागरी कृती उपक्रम यांची माहिती नागरिकांना देण्यात आली. फिरत्या प्रदर्शनासह विविध माहितीपर बॅनरच्या माध्यमातून पोलीस दलाच्या कार्याची आणि जवानांच्या योगदानाची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. त्यामुळे आरोग्यसेवेसोबतच पोलीस दल व नागरिक यांच्यातील संवाद आणि जनसंपर्क वाढविण्याचाही प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

२०२१ पासून २२३ आरोग्य मेळावे; ५० हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी -
गडचिरोली पोलीस दलाकडून सन २०२१ पासून राबविण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण २२३ आरोग्य मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून जवळपास ५० हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

याशिवाय, पोलीस दलाच्या वतीने आयोजित सहा रक्तदान शिबिरांतून एकूण ४,८६४ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. तसेच ऑपरेशन रोशनी या उपक्रमाच्या माध्यमातून ९,९७१ हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, १,५४२ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या उपक्रमांमुळे दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी -
या आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि सहायक पोलीस अधीक्षक, धानोरा सुयश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कटेझरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चेतन गवळी आणि पोलीस अंमलदार यांनी शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांतून हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि विविध कल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क दृढ करणे, या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.





  Print






Related Photos