जिल्हा रुग्णालयात जागतिक दृष्टी दिन साजरा : निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : डोळ्यांच्या आजारांविषयी जनजागृती करणे, नेत्रआरोग्याचे महत्त्व पटवून देणे आणि नियमित नेत्रतपासणीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने जिल्हा रुग्णालय, भंडारा येथील नेत्रविभागात ८ ऑक्टोबर रोजी जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा येथील अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर उपस्थित होत्या. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अतुलकुमार टेंभुर्णे, जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. रेखा धकाते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (एनपीसीबी) डॉ. दुर्गेश पशीने, डॉ. अरुण नळंगे, डॉ. मनीष बत्रा, डॉ. सुधा मेश्राम आणि अधिसेविका वंदना मन्ने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डोळ्यांचे विविध आजार, त्यांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित नेत्रतपासणीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन करून नेत्रदानामुळे दृष्टिहीन व्यक्तींना नवी दृष्टी मिळण्यास मदत होते, याबाबत जनजागृती करण्यात आली.
जागतिक दृष्टी दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रिया सोयाम, डॉ. हृतुजा ब्राह्मणकर, नेत्रदान समुपदेशक सोनाली लांबट, परिसेविका कल्पना जाधव, मानसी गिदमारे, नेत्रचिकित्सक अधिकारी कोमल शिंदे व कोमल गेडाम, अधिपरिचारिका कामिनी पुडके, कक्ष सेवक शेखर गुनेरीय, रवी रघडे, सुषमा राघोर्ते आणि आहारतज्ज्ञ विनीता चकोले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला रुग्णालयातील कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




