सुबोध विद्यालयात विद्यार्थिनींना आरोग्या विषयी मार्गदर्शन


- मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता आणि किशोरवयीन शारीरिक बदलांबाबत जनजागृती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी भंडारा : किशोरवयीन मुलींमध्ये वयानुरूप होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करणे तसेच आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मासळ येथील सुबोध विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका वर्षा बोंदरे होत्या. यावेळी अलका ठवरे, मालती फुंडे, वर्षा रामटेके आणि जया राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान जया राणे यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी ही शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे सांगत या काळात घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व आणि किशोरवयात शरीरात होणारे नैसर्गिक बदल याविषयी मार्गदर्शन केले. मासिक पाळीविषयी समाजात आढळणारे गैरसमज दूर करून या विषयाकडे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किशोरवयात मुलींच्या शरीरात आणि मनात विविध बदल होत असतात. या बदलांविषयी योग्य माहिती मिळाल्यास मुलींना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे होते. त्यामुळे अशा विषयांवर मोकळेपणाने चर्चा होणे आणि विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना मासिक पाळी, स्वच्छता, आरोग्याची काळजी आणि शारीरिक बदलांविषयी उपयुक्त माहिती मिळाली. तसेच मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करून आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत झाली. कार्यक्रमाला वर्षा बोंदरे, अलका ठवरे, मालती फुंडे, वर्षा रामटेके, जया राणे यांच्यासह विद्यालयातील अन्य उपस्थित होते.




Petrol Price




