मारहाण व अपमानास्पद वर्तनाच्या आरोपांवरून चर्मकार समाजाचे पोलिसांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / राजुरा : मारहाण तसेच अपमानास्पद शाब्दिक वर्तन केल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी चर्मकार समाजाच्या वतीने राजुरा शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. सदर घटनेची सखोल चौकशी करताना घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यात यावेत. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलमधील व्हिडिओ व ऑडिओ रेकॉर्डिंग आणि अन्य उपलब्ध पुरावे तपासण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. आवश्यक असल्यास संबंधित वैद्यकीय कागदपत्रांचीही पडताळणी करावी, असे नमूद करण्यात आले.
चौकशीत मारहाण, धमकी, शिवीगाळ, अपमानास्पद शाब्दिक वर्तन किंवा अन्य कोणताही गुन्हा झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजाच्या प्रतिनिधींनी केली. तसेच संबंधित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव, धमकी अथवा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याची विनंती पोलिस प्रशासनाला करण्यात आली.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विप्लव रा. लांडगे, राजुरा तालुका युवा अध्यक्ष लक्ष्मण तिखे, संत रविदास चर्मकार फाउंडेशन राजुराचे अध्यक्ष मनोज सदाफळे, सहसचिव अनिल पवार, उत्सव समितीचे सचिव ओमदेव इंगोले, समाजाचे सल्लागार बालाजी लिपटे, मेंढे गुरुजी यांच्यासह समाजबांधवांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. प्रकरणाची चौकशी कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे वस्तुस्थिती निश्चित करावी आणि त्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.




Petrol Price




