माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते रोमपल्ली येथे टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम अश्या रोमपल्ली येथे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या ग्रामीण भागात विविध क्रीडा स्पर्धा सुरू असून सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या रोमपल्ली येथे सुद्धा कुपारलिंगो क्रिकेट क्लब द्वारा भव्य टेनिस बॉल ग्रामीण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बुधवार १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धेसाठी ३१ हजार रुपयांचा प्रथम, २१ हजार रुपयांचा द्वितीय आणि १५ हजार रुपयांचा तृतीय पारितोषिक व आकर्षक शिल्ड ठेवण्यात आले. या भागात पहिल्यांदाच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने रोमपल्ली परिसरातील बहुतांश गावातील चमुनी सहभाग घेतला. उदघाटन सामन्यात स्वतः भाग्यश्री आत्राम यांनी मैदानात क्रिकेटची बॅट हातात घेत जोरदार फटकेबाजी केली.
उदघाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून मादारम चे उपसरपंच लक्ष्मीकांता जंगा, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रामकिष्टु नीलम, बोरमपल्लीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश संगर्ती, माजी पंचायत समिती सदस्य समय्या कुळमेथे, ग्रामपंचायत सदस्य बंडू गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिरंचाचे उपाध्यक्ष सत्यम पिडगू, रोमपल्ली चे सामाजिक कार्यकर्ते कोरके गावडे, बिरा गावडे, युवा कार्यकर्ते गणेश बोधनवार, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, नॅशनल हॉकी पटू महेश मडावी तसेच सिरोंचा तालुक्यातील आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Gadchiroli