रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला पोलिस महासंचालक मिळाल्या आहेत.
रजनीश सेठ ३१ डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर चार दिवसांनी सरकारने रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. राज्यात सर्वांत वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.
कार्यालयीन कामाप्रति समर्पण -
कार्यालयीन कामाप्रति समर्पण हा रश्मी शुक्ला यांचा विशेष गुण मानला जातो. तसेच कोणतेही काम पेंडिंग न ठेवणाऱ्या अधिकारी असा त्यांचा लौकिक आहे. पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक या खालच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कल्याणाकडे नेहमीच विशेष लक्ष देणाऱ्या अधिकारी म्हणूनही त्यांची पोलिस दलात ओळख आहे. त्या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
कारकीर्द -
- रश्मी शुक्ला या हैदराबादच्या नॅशनल पोलिस अकादमीतून उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विशेष काम केले. त्यासाठी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांत महिलांसाठी समुपदेशन केंद्र सुरू केले.
- नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयक म्हणून काम केले होते.
- २०१६ ते २०१८ या कालावधीत त्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली.
- रश्मी शुक्ला यांना २००४ साली पोलिस महासंचालक पदक, २००५ मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि २०१३ मध्ये पोलिस मेडल मिळाले आहे.
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये त्यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
- पुढे फेब्रुवारी २०२१ मध्ये त्या केंद्रीय राखीव पोलिस दलात अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या.
News - Rajy