महत्वाच्या बातम्या

 रेल्वे परिसरातील बाल सुरक्षेसाठी यंत्रणांचा समन्वय : बल्हारशाह येथे आढावा बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय रेल्वेच्या संपर्कात येणाऱ्या मुलांची काळजी व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सुधारित प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) अंतर्गत द्वैमासिक बाल सुरक्षा गटाची आढावा बैठक मंगळवारी (१२ मे २०२६) बल्हारशाह रेल्वे स्टेशनच्या व्हीआयपी हॉलमध्ये पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्षेत्रीय अधिकारी डी. डी. भालाधारे होते.

या बैठकीस स्टेशन व्यवस्थापक दशरथ सिंग, आरपीएफ एपीआय प्रकाश लाडस्कर, सीटीआय वाय. जी. खडगी, जीआरपी पोलीस चौकी बल्लारपूरचे अमलदार अखिलेश चौधरी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाइल्ड लाईन चंद्रपूरचे प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहुर्ले, हृदया संस्थेचे शशिकांत मोकासे, रेल्वे चाइल्ड लाईन टीमचे पर्यवेक्षक भास्कर ठाकूर, बबिता लोहकरे, विजय अमरथराज, धर्मेंद्र मेश्राम, सुरेंद्र धोडरे आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला रेल्वे चाइल्ड लाईन टीमने उपस्थित अधिकारी व मान्यवरांचे स्वागत केले. केस वर्कर सुरेंद्र धोडरे यांनी मागील बैठकीचा आढावा सादर केला. त्यानंतर पर्यवेक्षक भास्कर ठाकूर यांनी मार्च, एप्रिल आणि मे २०२६ दरम्यान रेल्वे परिसरात करण्यात आलेल्या कार्याचा अहवाल सादर केला.

अहवालानुसार मार्च व एप्रिल महिन्यात काळजी आणि संरक्षण सहाय्याची गरज असलेल्या एकूण १४ बालकांना मदत करण्यात आली. यामध्ये ९ मुले व ५ मुलींचा समावेश होता. ९ बालकांना बाल कल्याण समिती, चंद्रपूरसमोर हजर करण्यात आले, तर उर्वरित बालकांची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आली. सर्व बालके सुरक्षितपणे आपल्या घरी परतल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच मुलांना घरी पोहोचेपर्यंत त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बैठकीत आरपीएफ, जीआरपी आणि चाइल्ड हेल्पलाइन टीमकडून रेल्वे परिसरात बाल सुरक्षा, बाल तस्करी प्रतिबंध आणि हरवलेल्या मुलांच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ विषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यावरही चर्चा झाली.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी महिला व बाल विकास विभागामार्फत १८ वर्षांवरील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधांची माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात डी. डी. भालाधारे यांनी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयामुळे रेल्वे चाइल्ड लाईन टीम हरवलेल्या व गरजू मुलांसाठी प्रभावी काम करीत असल्याचे सांगितले.

बैठकीचे संचालन बबिता लोहकरे व विजय अमरथराज यांनी केले, तर धर्मेंद्र मेश्राम यांनी आभार प्रदर्शन केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos