महत्वाच्या बातम्या

 घुग्घूस येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामासाठी उर्वरित २ कोटी रुपयांचा निधी मंजुर


 - आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना फलीत, अंतिम टप्यातील कामाला मिळणार गती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अंतिम टप्यात असलेल्या कामाला गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. परिणामी त्यांच्या प्रयत्नांना फलीत आले असून सदर बांधकामासाठी अर्थसंकल्पीय निधीमध्ये उर्वरित दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने घुग्घूस येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले होते. याकरिता १० कोटी ५५ लक्ष रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घुग्गुस ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यात आले. मात्र शासनाचा निधी रखडल्यामुळे सदर काम बंद पडले होते.

घुग्गुस शहर कोळसा खाण व वाहतूक, लोह शुद्धीकरण प्रकल्प यामुळे सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या भीषण समस्या जाणवत आहे. त्यामुळे निर्माणाधीन घुग्गुस ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता सदर रुग्णालयाच्या कामासाठी उर्वरित निधी मंजूर करावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना केली होती. त्यानंतर सदर विकासकामासाठी ५ काटी २६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र यानंतरही मंजुर निधी पैकी दोन कोटी रुपयांचा निधी प्रलंबित होता. त्यामुळे सदर रुग्णालयाचे अंतिम टप्यात असलेले काम मंदावले होते.

या रुग्णालयाची येथे अत्यंत गरज आहे. त्यामुळे सदर काम वेळेत पुर्ण व्हावे यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी उर्वरित निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर त्यांच्या पाठपूराव्याला यश आले आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम बजेट सादर केला. या बजेटमधील निधीमध्ये सदर रुग्णालयाच्या कामासाठी उर्वरित असलेला २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सदर रुग्णालयाचे काम लवकच पूर्ण होऊन ते नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. निधी मंजूर केल्या बदल आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, उमुपख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आरोग्य मंत्री ताणाजी सावंत यांचे आभार मानले आहे.   





  Print






News - Chandrapur




Related Photos