जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेऊ नका : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


- कृत्रिम तुटवडा टाळण्याचे कंपन्यांना निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. तेल कंपन्यांचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि विक्री अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. इंधनाचा कोणताही कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश तेल कंपन्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई आणि इतर शुद्धीकरण केंद्रांमधून नियमितपणे इंधन पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.
कंपनीनिहाय सद्य स्थितीतील साठा
नागपूर जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (HPCL) जिल्ह्यातील ९९ पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा १२६५ किलोलिटर साठा उपलब्ध असून तो ४ दिवस पुरेल इतका आहे. डिझेलचा १४९७ किलोलिटर साठा उपलब्ध असून तो ३ दिवस पुरेल इतका आहे. या पंपांवर प्रतिदिन ३०१ किलोलिटर पेट्रोल आणि ४६८ किलोलिटर डिझेलची विक्री होत असते.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (BPCL) जिल्ह्यातील १४३ पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा २४९४ किलोलिटर साठा उपलब्ध असून तो ६ दिवस पुरेल इतका आहे. डिझेलचा ३८३० किलोलिटर साठा उपलब्ध असून तो ४ दिवस पुरेल इतका आहे. या पंपांवर प्रतिदिन ४१२ किलोलिटर पेट्रोल आणि ९३० किलोलिटर डिझेलची विक्री होत असते. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (IOCL) जिल्ह्यातील १३६ पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा १२८० किलोलिटर साठा उपलब्ध असून तो ५ दिवस पुरेल इतका आहे. तर डिझेलचा २०५० किलोलिटर साठा उपलब्ध असून तो ४ दिवस पुरेल इतका आहे. या पंपांवर प्रतिदिन २५५ किलोलिटर पेट्रोल आणि ५१० किलोलिटर डिझेलची विक्री होत असते.
ओळख पडताळून शेतीसाठी कॅनमध्ये मिळणार इंधन
सुरक्षेचा उपाय म्हणून पेट्रोल पंप चालकांना शेतीसाठी वाहनाशिवाय इतर कोणत्याही कॅनमध्ये इंधन देता येईल. पेट्रोलियम नियम, २००२ मधील तरतुदी विचारात घेता शेतकऱ्यांच्या शेती कामाकरीता लागणारे डिझेल देताना शेतकऱ्यांचे ओळखपत्र (सातबारा, आधारकार्ड) घेऊन त्यांना एका दिवसापोटी जास्तीतजास्त ४० लिटर डिझेल देता येईल. याचा गैरफायदा अन्य कोणी घेवू नये यासाठी संबंधित वाहनाच्या आरसी बुकची नोंद घेतली जाईल. पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी आणि संभाव्य वाद टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंपांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
नियम व सूचना यांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप चालकांची
वरील बाबीचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक, व्यवस्थापक यांची राहील. या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती/संस्थेविरुद्ध पेट्रोलियम नियम, २०२२ मधील नियम १९८ ते २०२ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ मधील तरतुदीनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
नागरिकांनी इंधनाचा वापर आवश्यकतेनुसार आणि जबाबदारीने करावा, तसेच वाहनांची नियमित देखभाल, योग्य टायर प्रेशर आणि आवश्यक तेव्हाच वाहनाचा वापर केल्यास इंधन बचतीत मदत होणार आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
News - Nagpur




Petrol Price




