महत्वाच्या बातम्या

 ओव्हरलोड लाकूडवाहू ट्रकांचा शहरातून धोकादायक प्रवास : अपघाताचा धोका वाढला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कळमना येथून लाकडाची वाहतूक करणारे ओव्हरलोड ट्रक शहरातील मुख्य मार्गावरून पेपर मिलच्या दिशेने धावत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लाकडे भरली जात असून ती योग्य प्रकारे बांधलेली नसल्याने कधीही रस्त्यावर कोसळून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास कळमना येथून आलेले दोन ओव्हरलोड लाकूडवाहू ट्रक मुख्य मार्गाने पेपर मिलकडे जाताना दिसले. ट्रकमधील लाकडांचे ओंडके सुरक्षितपणे बांधण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाहतुकीदरम्यान लाकडे रस्त्यावर पडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कळमना येथून येणारे अशा प्रकारचे ट्रक नियमितपणे शहरातून जातात. यापूर्वीही ट्रकमधून लाकडे रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होत असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांनी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासनाने अशा ओव्हरलोड वाहनांची तातडीने तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, तसेच लाकडे सुरक्षितरीत्या बांधल्याशिवाय अशा ट्रकांना शहरातून वाहतूक करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. वेळेत कारवाई न झाल्यास निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos