एन.डी.ए. परीक्षेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या तीन कॅडेट्सची भरारी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात आलेल्या एन.डी.ए. व एन.ए. (I) तसेच सी.डी.एस. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या तीन कॅडेट्सनी उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
१२ एप्रिल २०२६ रोजी देशभरात एन.डी.ए. व एन.ए. (I) तसेच सी.डी.एस. परीक्षा दोन सत्रांमध्ये पार पडली होती. देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. दरवर्षी सुमारे ७ लाखांहून अधिक विद्यार्थी एन.डी.ए. परीक्षेसाठी नोंदणी करतात, तर जवळपास ६.५ लाख विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देतात. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) व नौदल अकादमी (NA) मिळून एकूण ४०० जागा उपलब्ध असून त्यामध्ये ३७० जागा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी तर ३० जागा नौदल अकादमीसाठी राखीव आहेत. यामध्ये लष्करासाठी २०८, हवाई दलासाठी १२० आणि नौदलासाठी ४२ जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची पद्धत असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत आव्हानात्मक मानली जाते.
अत्यंत स्पर्धात्मक आणि कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे कॅडेट मास्टर ऐश्वर्य कचलामी, कौशिक जिडीवार आणि स्मित तुलावी यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत लेखी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा शैक्षणिक व सैनिक क्षेत्रातील लौकिक अधिक उंचावला आहे.
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आता पुढील टप्प्यात सेवा निवड मंडळाच्या (SSB) मुलाखत प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. ही मुलाखत प्रक्रिया तब्बल ५ दिवस चालणारी असून त्यामध्ये उमेदवारांची बुद्धिमत्ता, नेतृत्वगुण, मानसिक क्षमता, शारीरिक तंदुरुस्ती तसेच निर्णयक्षमता यांची विविध चाचण्यांद्वारे कसून परीक्षा घेतली जाते. देशातील सैन्यदलासाठी अधिकारी निवडण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक मानली जाते.
या यशाबद्दल भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरीचे सचिव धर्मरावबाबा आत्राम, संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, संस्थेच्या सदस्या तनुश्री आत्राम, सदस्य हर्षवर्धनराव आत्राम, विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी कॅडेट्सचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसाठीही या यशामुळे प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून भविष्यात आणखी विद्यार्थी देशसेवेसाठी सैन्यदलात अधिकारी म्हणून योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




