शेतकरी उत्पादक कंपन्याव्दारे जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेत बदल होतील : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयाच्या पीकव्यवस्थेत धान पिकांव्यतीरिक्त वैविध्य आवश्यक असून शेतकरी उत्पादक कंपन्याव्दारे शेतकऱ्यांनी विकणारी पिके घ्यावीत. उत्पादक कंपन्यानी गुणात्मक उत्पादनांसह, विपणन तंत्र अवलंबावीत, त्यानेच जिल्हयाच्या कृषी अर्थव्यवस्थेत बदल होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज नियोजन सभागृहात आयोजित कार्यशाळेत व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमीत्य आत्मा व जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने आज शेतकरी उत्पादक कंपन्याची दिशा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्या कार्यशाळेच्या उदघाटकीय सत्रात ते बोलत होते.
प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समीर कुर्तकोटी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, कृषीसमृध्दी प्रकल्पाचे संचालक रविकिरण पाटील, प्रकल्प संचालक (आत्मा) उर्मिला चिखले, जिल्हा कृषी अधिक्षक अर्चना कडू, जिल्हा नियोजन अधिकारी शरद बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
जिल्हयातील भाजीपाला, फळबाग, रेशीम लागवडीत यशस्वी प्रयोग केलेल्या प्रगतीशील शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव या कार्यशाळेत सांगितले. तर फकत शासकीय सबसीडीसाठी कंपनी स्थापन न करता ती आर्थिकरित्या स्वावंलबी करण्याकडे शेतकऱ्यांनी भर दयावा, असे कळकळीचे प्रतिपादन कृषी समृध्दीचे संचालक रविकीरण पाटील यांनी यावेळी केले. ३० कोटीच्या वर वार्षिक उलाढाल असणा-या शेतकरी उत्पादक कंपनीचा प्रवास त्यांनी यावेळी मांडला.
संग्राम सिडसचे अमरावतीचे संकेत उघडे यांनी चारा पिकाकरीता बियाणे निर्मीतीकरीता विस्तृत मार्गदर्शन केले. शेळीपालनाव्दारे रोज नगदी उत्पन्न मिळते, शेळी पालन म्हणजे एटीएम कार्डसारखे आहे. चांगल्या दुग्धोत्पादनासाठी पौष्टीक चारा गुरांना दिला पाहिजे. भंडारा जिल्हयात दुग्धोत्पादन मोठया प्रमाणावर होते. आता क्लीन मिल्कला म्हणजे लो बॅक्टेरीआ काउंट असणाऱ्या दुधाला मोठी मागणी असल्याने तसा चाराही गायी, म्हशींना उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्याच्या समृध्दी ऑर्गेनिक फार्मचे सहाय्यक प्रबंधक प्रतिक इपार यांनी आरोग्याच्या दृष्ट्रीने नागरिक सेंद्रीय शेतीकडे वळत असून त्यासाठी आवश्यक ते प्रमाणीकरण शेतकऱ्यांनी करणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन केले.
जिल्हयातील सुधीर धकाते, आजगावकर शेतकरी उत्पादक कंपनी, तुमसर फार्मर प्रोडयुसर कंपनी, चौरास कंपनी, चिंतामणी शेतकरी उत्पादक कंपन्यानी त्यांचे विस्तृत सादरीकरण केले. भेंडी, भुसुधार खते, हळद, बीजप्रक्रीया यासह अनेक उत्पादने घेत असतांना त्यांना आलेल्या अडचणी त्यांनी यावेळी मांडल्या.
सुत्रसंचलन कृषी अधिकारी वृषाली देशमुख यांनी केले. आभार आटे यांनी मानले. जिल्हयातील स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे शेतकरी यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
दुपारच्या सत्रात तंत्र अधिकारी प्रल्हाद कोल्हे यांनी ट्रायकोकार्ड निर्मीतीबाबत मार्गदर्शन केले. शेतकरी उत्पादक कंपन्याच्या सभासदांनी उत्तम प्रतिसाद देत त्यांच्या सर्व अडचणींचे निराकरण देखील तज्ञ मंडळीनी केले.
News - Bhandara