महत्वाच्या बातम्या

 विमानतळासाठी भूमी अधिग्रहणाबाबत गुरवळा-हिरापूर ग्रामस्थांमध्ये संभ्रम : डॉ. अशोकजी नेते व आ.डॉ. मिलिंद नरोटे यांनी घेतली आढावा बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहराजवळील गुरवळा, हिरापूर, राखी आदी गावांमध्ये प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या भूमी अधिग्रहणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम, चिंता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाकडून शेती जमिनी अधिग्रहित केल्या जाणार असल्याच्या चर्चांमुळे गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती.

ग्रामस्थांच्या भावना आणि समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी माजी खासदार व भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते आणि गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गुरवळा व हिरापूर गावांना भेट देत सविस्तर आढावा बैठक घेतली.

बैठकीत दोन्ही गावांतील मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की शेती ही केवळ जमीन नसून त्यांचा आत्मा, कुटुंबाचा उदरनिर्वाह, परंपरेचा वारसा आणि वडिलोपार्जित जीवनाचा आधार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेती जमीन देणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी बैठकीत मांडली. या वेळी सर्वत्र एकच आवाज ऐकू आला – आम्ही शेती देणार नाही.

ग्रामस्थांच्या भावना ऐकल्यानंतर मार्गदर्शन करताना डॉ. अशोकजी नेत म्हणाले की, शेतकरी आणि गावकऱ्यांच्या हिताविरोधात कोणताही निर्णय होऊ दिला जाणार नाही. शेतकरी बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल. त्यांनी मुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जाण्याचे आश्वासन दिले. लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन शिष्टमंडळासोबत सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, जनतेच्या विश्वासाला तडा बसू दिला जाणार नाही. भूमी अधिग्रहणासंदर्भातील शेतकऱ्यांच्या भावना, समस्या आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवून न्याय्य मार्ग काढण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.

बैठकीत किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, जेष्ठ नेते प्रमोद पिपरे, भाजप जेष्ठ नेते डॉ. भारत खटी, भाजप तालुकाध्यक्ष दतू सुत्रपवार, युवा नेते अनिल तिडके, राहुल पोरेड्डीवार, गुरवळा सरपंच जया मंटकवार, हिरापूर सरपंच शालिनी कुमरे, राखी सरपंच ज्योती तलांडे, उपसरपंच दिवाकर मिसार, पो.पा. कुसुम बारसागडे, तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना आपले प्रश्न थेट लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याचे व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या समस्यांवर सकारात्मक आणि न्याय्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos