महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलाचे कोंबिंग ऑपरेशन व ऑपरेशन ऑल आऊट : १३ ठिकाणी छापे मारून ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त


- १३९ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती

- नाकाबंदीत ३०० वाहनांची तपासणी तर ४० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच दारू, गुटखा यांसारख्या अवैध व्यवसायांना पूर्णपणे आळा घालण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक . एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली काल २४ जून २०२६ रोजी गडचिरोली उपविभागात विशेष ऑपरेशन ऑल आऊट आणि कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली. या व्यापक मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन गडचिरोली, आरमोरी आणि चामोर्शी हद्दीत विविध ठिकाणी अवैध दारू व इतर अवैध धंद्यांवर एकाच वेळी छापे टाकून मोठी कारवाई करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात तीव्र खळबळ उडाली आहे.

काल सायंकाळी ५.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत अत्यंत गुप्ततेने चाललेल्या या विशेष मोहिमेचे थेट नेतृत्व सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी केले. या मोहिमेत गडचिरोली, आरमोरी व चामोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपापल्या क्षेत्रातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अवैधरीत्या साठवून ठेवलेला एकूण ५,००,७०० रुपये किमतीचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित १३ अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या धडक मोहिमेदरम्यान केवळ अवैध धंद्यांवरच कारवाई करण्यात आली नाही, तर भविष्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी व संशयास्पद हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या अंतर्गत पोलीस अभिलेखानावरील आणि परिसरात सक्रिय असणाऱ्या एकूण १३९ सराईत गुन्हेगारांची जागेवरच कसून तपासणी करण्यात आली. तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हद्दीतील विविध हॉटेल्स, लॉजेस आणि निर्जन स्थळांची पोलिसांनी कसून तपासणी केली; ज्यामध्ये हॉटेलची नोंदवही, ओळखपत्रे आणि तेथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या माहितीची सखोल पडताळणी करण्यात आली.

अवैध वाहतुकीला पायबंद घालण्याच्या उद्देशाने शहराच्या आणि तालुक्यांच्या मुख्य नाक्यांवर तगडी नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटणाऱ्या एकूण ३०० वाहनांची तपासणी करण्यात आली असून, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मोटार वाहन कायद्यान्वये दोषी आढळलेल्या ४० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस दलाने अचानक घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्यांमध्ये पोलिसांबद्दल आदराची आणि सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.

सदर मोहिमेच्या यशाबद्दल बोलताना पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले की, गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असून, भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबवून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

ही संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) . गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, आरमोरीचे पोलीस निरीक्षक कैलास गवते, चामोर्शीचे पोलीस निरीक्षक दिपक डोंब आणि सर्व पोलीस अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos