महत्वाच्या बातम्या

 मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी T-१२० वाघीण जेरबंद : वनविभागाची यशस्वी कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अखेर T- १२० (मादी) वाघीणीला वनविभागाने बुधवारी २९ जुलै रोजी यशस्वीरित्या जेरबंद केले. ब्रह्मपुरी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली आवळगाव उपक्षेत्रातील हळदा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक २२२ मध्ये ही कारवाई करण्यात आली.

९ जुलै २०२६ रोजी कुरण गट क्रमांक २१ येथे रानभाजी गोळा करण्यासाठी गेलेल्या अनिल भास्कर दिवटे ३२ वर्ष रा. बल्लारपूर ता. ब्रम्हपुरी यांच्यावर T- १२० वाघीणीने हल्ला करून त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संबंधित वाघीण गावालगतच्या शेतशिवारात वारंवार फिरत असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वीही या वाघीणीकडून मनुष्यहानी तसेच पाळीव जनावरांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये वनविभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

या पार्श्वभूमीवर भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून वनविभागाने T-१२० वाघीणीला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला. कारवाईदरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी व रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी भूल देण्यासाठी डार्ट तयार केला. त्यानंतर पोलीस हवालदार (शूटर) अजय सी. मराठे यांनी अचूक डार्ट मारून वाघीणीला बेशुद्ध केले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने सुरक्षितपणे वाघीणीला जेरबंद केले.

ही कारवाई उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक अरविंद जे. वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश व्ही. सोनडवले, वन्यजीव तज्ज्ञ राकेश अहुजा, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पोलीस हवालदार (शूटर) अजय सी. मराठे तसेच विकास ताजने, योगेश लाकडे, प्रफुल एन. वाटगुरे, गुरुनानक ढोरे, दिपेश टेभुर्ने, वसीम शेख, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर यांच्यासह वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.वनविभागाच्या या कारवाईमुळे परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos