सिरोंचा नगरपंचायतीत मोठा राजकीय ट्विस्ट : पद्मा सतीश बोगे नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

- माजी मंत्री तथा आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतरानंतर नवे नेतृत्व उदयास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीच्या राजकारणात अखेर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला असून, माजी मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष वसेकर, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बनाय्या जनगाम, तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी आणि शहराध्यक्ष रवी सुलतान यांच्या नेतृत्वात सौ. पद्मा सतीश बोगे यांची नगरपंचायत अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नगरपंचायत सभागृहात आज पार पडलेल्या अधिकृत निवड प्रक्रियेनंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीची घोषणा करताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा नगरपंचायतीत सत्तांतराच्या हालचालींना वेग आला होता. विद्यमान नगराध्यक्ष व नगर उपाध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली होती. त्यानंतर अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत असतानाच पद्मा सतीश बोगे यांच्या नावाला बहुमताचा पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले होते.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले इतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने बोगे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. आज झालेल्या अधिकृत प्रक्रियेनंतर त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीमुळे सिरोंचा नगरपंचायतीत नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
शहरातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून बोगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, आगामी काळात नगरपंचायतीच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, सतीश राचारलावार, नगरसेविका माहेश्वरी पेद्दापेल्ली, सपना तोकाला तसेच तालुका कार्यकारी अध्यक्ष मदनय्या मादेशी, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुगुणु, समय्या तोकाला, संजू पेद्दापेल्ली, कौशिक बोगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




