महत्वाच्या बातम्या

 जुनोना जंगलात स्वच्छता मोहिमेत चक्क १०० किलो दारूच्या बाटल्या : ट्रॅक्टरभर कचरा संकलित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जुनोना वनपरिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात धक्कादायक वास्तव समोर आले. जुनोना-चिचपल्ली जंगलालगतच्या रस्त्यावरून तब्बल ट्रॅक्टरभर कचरा संकलित करण्यात आला असून त्यामध्ये सुमारे १०० किलो वजनाच्या दारूच्या काचेच्या बाटल्या आणि इतर काचेचा कचरा आढळून आला. वनविकास महामंडळ आणि हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या स्वच्छता अभियानात सुमारे ३० स्वयंसेवकांनी सहभाग घेत जंगल परिसरातील प्लास्टिकच्या बाटल्या, वेफर्सची पाकिटे, काचेच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा केल्या. जंगलातील रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याचे यावेळी निदर्शनास आले.

जुनोना जंगल परिसर हा वाघ, बिबट, अस्वल, हरीण, सांबर, रानगवे, विविध पक्षी आणि सरीसृप यांसारख्या वन्यजीवांचे महत्त्वपूर्ण अधिवास क्षेत्र आहे. शहरातील अनेक नागरिक या परिसरात निसर्ग पर्यटनासाठी भेट देतात. मात्र काही मद्यपी आणि बेजबाबदार व्यक्ती जंगलात मद्यपान करून काचेच्या बाटल्या, प्लास्टिक व इतर कचरा टाकत असल्याचे वास्तव या मोहिमेतून पुन्हा एकदा समोर आले.

विशेष म्हणजे अनेक ठिकाणी फुटलेल्या काचेच्या बाटल्यांचा खच आढळून आला. या काचांमुळे वन्यप्राण्यांना दुखापत होण्याची शक्यता असल्याबाबत सहभागी सदस्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच जंगलात फेकण्यात येणारे प्लास्टिक वन्यजीवांसाठी गंभीर धोका निर्माण करत असल्याचेही सांगण्यात आले. प्लास्टिक पोटात गेल्यास पचनसंस्थेत अडथळे निर्माण होऊन अंतर्गत रक्तस्राव, अवयव निकामी होणे तसेच उपासमारीमुळे वन्यजीवांचा मृत्यू होऊ शकतो.

यावेळी उपस्थितांनी जंगल परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा न टाकण्याचे आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. जंगल हे वन्यजीवांचे घर असून त्याची स्वच्छता आणि जैवविविधता जपणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

स्वच्छता अभियानात सहाय्यक व्यवस्थापक कदम, वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम, कांबळे, पांचाळ, पायपरे, निमगडे, पंधरे, जत्तलवार, लुटे, देठे यांच्यासह हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, अभिषेक गजबे, जितू नोमुलवार, राहील अली, वनदीप रोडे, प्रसाद चट्टे, मिलिंद वाडीकर, पिंटू उईके, महेश उमरे आदींनी सहभाग घेतला. अभियानाची सांगता वृक्षारोपण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस. के. पंधरे यांनी केले.

वन्यजीव संरक्षणासाठी नागरिकांना आवाहन -
जंगल परिसरात दारूच्या बाटल्या, प्लास्टिक किंवा इतर कोणताही कचरा टाकू नये. कचरा केवळ कचरापेटीतच टाकावा. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos