ताडोबा बफर क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व लसीकरणासाठी विशेष मोहीम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वन्यप्राण्यांमध्ये संसर्गजन्य रोगांचा फैलाव रोखण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने बफर क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व लसीकरणासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. पीपल फॉर अॅनिमल्स, वर्धा आणि वाइल्ड सीईआर यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत असून ताडोबा बफर क्षेत्रातील ९५ गावांचा यात समावेश आहे.
वनक्षेत्रालगतच्या गावांमधील भटकी कुत्री अनेकदा वन्यप्राण्यांवर हल्ला करतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्यासोबतच रेबीज, डिस्टेंपर यांसारख्या गंभीर संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शक सूचनांनुसार ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ताडोबा प्रशासनाकडून बफर क्षेत्रात झोननिहाय सर्वेक्षण करून भटक्या कुत्र्यांना पकडण्यात येत आहे. त्यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. गर्भवती, अशक्त, आजारी तसेच सहा महिन्यांखालील पिल्लांना शस्त्रक्रियेतून वगळण्यात येते. पात्र कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करून त्यांना रेबीजसह विविध आजारांवरील लसी देण्यात येत आहेत. तसेच त्वचारोग व खरूजग्रस्त कुत्र्यांवर आवश्यक उपचारही केले जात आहेत.
२०२५-२६ या कालावधीत आतापर्यंत एकूण २ हजार ३६५ भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी पीपल फॉर अॅनिमल्स, वर्धा यांच्या माध्यमातून १ हजार ९४५ तर वाइल्ड सीईआरच्या माध्यमातून ४२० कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे.
भटकी कुत्री ही केवळ वन्यजीवांसाठीच नव्हे तर मानवी आरोग्यासाठीही गंभीर समस्या ठरत असल्याने हा कार्यक्रम संस्थात्मक पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ला यांनी दिली. भविष्यात संसर्गजन्य रोगांचा उद्रेक टाळण्यासाठी रक्तनमुना तपासणी, सिरोटायपिंग तसेच वनरक्षक आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रमही राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
News - Chandrapur




Petrol Price




